कारची लॉटरी लागल्याची बतावणी, कामगाराची १० हजाराची फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल
By दिनेश पठाडे | Published: September 6, 2022 06:09 PM2022-09-06T18:09:51+5:302022-09-06T18:10:32+5:30
कामगाराची अज्ञात व्यक्तींनी १० हजार रुपये उकळून फसवणूक केली आहे.
वाशिम: तुमच्या मोबाईल क्रमांकाला १ लाखाचे बक्षीस आणि ८ लाख रुपयाच्या कारची लॉटरी लागली असल्याची बतावणी करुन व नापतौल कंपनीच्या नावाने छापलेली कागदपत्रे पाठवून वाशिम हिंगोली नाका परिसरात राहणारे कामगार बबन रामभाऊ थोरात यांना अज्ञात व्यक्तींनी १० हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी थोरात यांनी ६ सप्टेंबर रोजी स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या फसवणूकीची तक्रार नोंदविली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मजुरदार असलेले बबन थोरात यांनी काही दिवसापूर्वी नापतौल कंपनीच्या अॅपव्दारे ब्ल्युटुथ हेडफोन ३०० रुपयाला ऑनलाईन खरेदी केला होता.
खरेदी केलेला हेडफोन मिळाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी नापतौल कंपनीच्या नावाने फोन आला की, तुमच्या फोन क्रमांकाला १ लाख २० हजार रुपयाचे बक्षीस लागले असून ८ लाखाची कार तुम्हाला बक्षीस म्हणून लागली आहे. त्यासाठी तुम्हाला १० हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. तसेच त्यांना नापतौल कंपनीची पोस्टाव्दारे अर्ज व इतर कागदपत्रे पाठविण्यात आले.
कामगाराची १० हजाराची फसवणूक
कागदपत्रे पाहिल्यानंतर थोरात यांचा विश्वास बसला व त्यांनी १ ते ६ जुलै दरम्यान थोडेथोडे करुन तब्बल १० हजार रुपये संबंधित व्यक्तीला ऑनलाइनद्वारे पाठविले. मात्र पैसे मिळाल्यानंतर बक्षिसाची रक्कम पाठविण्याऐवजी त्या अज्ञात व्यक्तीने थोरात यांना पुन्हा १२ हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे थोरात यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून नापतौल कंपनीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या नावाने तक्रार दाखल केली.