मळणी यंत्रात अडकून युवकाचा मृत्यू; वाशिम जिल्ह्यातील सुदी शिवारातील घटना
By दादाराव गायकवाड | Updated: October 13, 2022 19:35 IST2022-10-13T19:35:20+5:302022-10-13T19:35:39+5:30
वाशिम जिल्ह्यातील सुदी येथे मळणी यंत्रात अडकून युवकाचा मृत्यू झाला आहे.

मळणी यंत्रात अडकून युवकाचा मृत्यू; वाशिम जिल्ह्यातील सुदी शिवारातील घटना
वाशिम: सोयाबीन काढत असताना मळणी यंत्रात अडकून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालेगाव तालुक्यातील सुदी शिवारात गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजताच्या सुमारास घडली. विलास नथुजी खुळे(वय ३२ वर्षे ), असे मृतकाचे नाव असून, तो खैरखेडा येथील रहिवासी होता.
मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथील रहिवासी विलास खुळे हा युवक गावातीलच एका ट्रॅक्टरवर चालकासोबतच ट्रॅक्टरच्या मळणी यंत्रात सोयाबीनचे काड लोटण्याचे कामही मजुरीने करत होता. त्याचा अतिरिक्त मोबदलाही त्याला मिळत असे. गुरुवार १३ ऑक्टोबरला विलास खुळे हा गावातीलच विनोद कदम यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३७ व्ही ९२२७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर जोडणी केलेल्या मळणी यंत्राने सोयाबीन काढणीसाठी चालक म्हणून खैरखेडा येथील रहिवासी असलेल्या सोनिराम इंगळे यांच्या सुदी शेतशिवारातील शेतात गेला होता.
सोयाबीनचे काड मशीनमध्ये लोटत असताना अचानक विलासचा अचानक तोल जाऊन तो मळणी यंत्रामध्ये पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. विलास खुळे याला इपिलेप्सीचा आजार असल्याची माहिती त्याच्या भावाने तपासादरम्यान पोलिसांना दिल्याचे तपास अधिकारी कैलास कोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे काम करत असताना त्याला फिट येऊन तो मळणी यंत्रात पडला असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विलास खुळे हा अल्पभूधारक शेतकरी असून, त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नीसह एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.