आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना पुढील दोन वर्षे मिळणार नाही स्मार्ट ग्राम पुरस्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:42 PM2018-02-01T14:42:29+5:302018-02-01T14:46:55+5:30
वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.
वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.
राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते. तसेच तालुकास्तरावरून स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून तपासणी करून स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतो. स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हा स्तरावर निवड झालेल्या गावाचे नाव तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनात आले आहे. तसेच तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केलेल्या ग्राम पंचायतीला त्याच विकास कामांच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठीदेखील विचार करण्यात येते. त्यामुळे अन्य गावांना या पुरस्कारापासून वंचित राहण्याची वेळ येते. शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत देखील गावांनी पुन्हा तीच विकास कामे दर्शवून पुन्हा -पुन्हा पारितोषिक प्राप्त करीत असल्याने इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या कोणत्याही पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिलेल्या आहेत. ग्रामविकास विभागाचे आदेश वाशिम जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, शासनाच्या निर्देशानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरूवारी सांगितले.