वाशिम जिल्ह्यातील दीड लाखावर जनावरांना ‘आधार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:08 AM2021-01-06T11:08:33+5:302021-01-06T11:10:40+5:30
Washim News दीड लाखांहून अधिक जनावरांना आधार मिळाला असून, संकेतस्थळावर एक लाख ३४ हजार जनावरांची नोंदणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील पाळीव जनावरांना १२ अंकी आधार क्रमांक दिला जात आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक जनावरांना आधार मिळाला असून, संकेतस्थळावर एक लाख ३४ हजार जनावरांची नोंदणी झाली.
राष्ट्रीय रोगनिर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकुत रोगप्रतिबंधक लसीकरण व आधार क्रमांकासारखाच ओळख क्रमांक दिला जातो आहे. जिल्ह्यात साडेतीन लाखावर पाळीव जनावरे असून, राज्याचा पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या जनावरांना आधार (ओळख) क्रमांक देण्यासाठी कानात बिल्ला (टॅगिंग) टोचण्यात येत आहे.
हा टॅग म्हणजेच जनावरांचा ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांक आहे. या आधार क्रमांकाची ऑनलाइन नोंद शासनाच्या संकेतस्थळावर घेण्यात येत आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनात आहे. आधार क्रमांक नसेल तर जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही.
‘आधार’ असेल तरच विमा मिळणार
जनावरांची खरेदी-विक्री, नुकसानभरपाई किंवा विमा मिळण्यासाठी यापुढे आधार क्रमांक आवश्यक असणार आहे. नैसर्गिक आपत्तीत जनावरे दगावल्यास शासनाकडून भरपाई दिली जाते. या आधार क्रमांकाशिवाय नुकसानभरपाई तसेच विमा मिळणार नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जनावरांना ‘आधार’ मिळावा याकरिता पशुपालकही पशुवैद्यकीय दवाखान्याकडे धाव घेत असल्याचे दिसून येते.
पाळीव जनावरांची ओळख म्हणून १२ अंकी आधार क्रमांक (टॅगिंग) दिला जात आहे. आधार क्रमांक असेल तरच नुकसानभरपाई, विमा आदीचा लाभ मिळणार आहे. पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुवैद्यकीय केंद्रात जाऊन जनावरांना आधार क्रमांक घ्यावा.
-डॉ. विनोद वानखडे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प., वाशिम