अबब, पाळीव कुत्रा ४० हजाराला; महिन्याचा खर्च सहा हजारांच्या घरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:44+5:302021-08-29T04:39:44+5:30
पूर्वी जर्मन शेफर्ड, बुलडॉग हीच नावे आपल्याकडे प्रसिद्ध होती. अलीकडच्या काळात मात्र त्यात लॅब्रो, डाॅबरमॅन, पामेलियन, सिझू आदी प्रजातींच्या ...
पूर्वी जर्मन शेफर्ड, बुलडॉग हीच नावे आपल्याकडे प्रसिद्ध होती. अलीकडच्या काळात मात्र त्यात लॅब्रो, डाॅबरमॅन, पामेलियन, सिझू आदी प्रजातींच्या कुत्र्यांनाही विशेष पसंती दिली जात आहे. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचा योग्यरीत्या सांभाळ करणे या दृष्टीने करिअर म्हणूनही हे क्षेत्र परिचित होत आहे. विविध जातींचे कुत्रे पाळणे, त्यांची विक्री करणे, त्यांना खाद्य पुरविणे, विदेशी कुत्र्यांसाठी खास वैद्यकीय सेवा आदी व्यवसायही उदयास येत असल्याचे दिसत आहे.
.....................
याच पाच कुत्र्यांना शहरात सर्वाधिक मागणी
लॅब्रो : या प्रजातीच्या कुत्र्याची किंमत साधारणत: ३० हजार रुपये असून महिन्याकाठी २४०० रुपये खांद्यावर खर्च होतो.
जर्मन शेफर्ड : जर्मन शेफर्ड कुत्र्याची किंमत १८ ते २० हजारांच्या आसपास आहे. महिन्याला लसीकरणासह इतर खर्च सहा हजारांच्या घरात आहे.
डाॅबरमॅन : काळ्या रंगाचा हा कुत्रा खरेदी करण्यासाठी ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागतात. खाद्य व इतर खर्च सहा हजारांच्या आसपास आहे.
सिझू : आकाराने लहान असलेल्या या कुत्र्याची किंमत मात्र ३० ते ३५ हजारांपर्यंत आहे. त्याला विशेष खाद्य लागत नसून महिन्याचा खर्च हजार रुपयांत निपटतो.
पामेलियन : हा कुत्रा बाजारात ८ ते १० हजारांना मिळतो. सर्वसामान्य कुटुंबात तो सर्रास आढळतो. त्याच्या खाद्यावरही विशेष खर्च येत नाही.
...............
छंद आणि सुरक्षादेखील...
कुत्रा हा सर्वाधिक इमानदार प्राणी असल्याचे सर्वश्रुत आहे. आमच्याकडे लॅब्रो डाॅग असून गेल्या काही वर्षांत त्याला कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच आम्ही पाळत आहोत. या माध्यमातून कुत्रा पाळण्याचा छंद पूर्ण होण्यासोबतच घराची सुरक्षादेखील होत आहे.
- राहुल तुपसांडे
..............
गेल्या तीन वर्षांपासून आमच्या कुटुंबात जर्मन शेफर्ड प्रजातीचा कुत्रा वावरत आहे. तो सध्या आमचा सच्चा साथी झाला आहे. कुठलाही अनोळखी व्यक्ती घरात प्रवेश करीत असल्यास सर्वप्रथम तो त्यास विरोध करतो. कुटुंबातील ओळखीच्या सदस्यांवर मात्र त्याचे जीवापाड प्रेम आहे.
- वेदांत बाजड
..............
उलाढाल हजारोंच्या घरात
वाशिम शहरात अलीकडच्या काळात लॅब्रो, जर्मन शेफर्ड, सिझू, पामेलियन आणि डाॅबरमॅन या प्रजातीच्या कुत्र्यांना विशेष मागणी होत आहे. कुत्रे विकण्यापूर्वी त्याचा मायेने सांभाळ करावा लागतो. त्याचे खाद्य, लसीकरणावर महिन्याकाठी खर्च होतो. या व्यवसायातील उलाढाल हजारोंच्या घरात आहे.
- विवेक भागवत