अभिनव आंदोलन: नोकरीपासून वंचित अंध युवकाने मागितला दारू विक्रीचा परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:49 PM2018-04-30T13:49:51+5:302018-04-30T13:49:51+5:30
मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे.
मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे. मानोरा तालुक्यातील भोयणी येथील बाळू आडे या युवकाने हे निवेदन पाठविले असून, परवाना मिळाला नाही तरी, भोयणी येथे दारू विकून पोट भरो आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिला आहे.
भोयणी येथील बाळू गुलाब आडे हा युवक दोन्ही डोळ्यांनी अंध असून, त्याने पात्रतेनुसार नोकरी मिळविण्यासाठी प्रशासनाचे वारंवार उंबरठे झिजविले. तथापि, त्याच्या पदरी निराशेशिवाय काहीच आले नाही. अंध असतानाही प्रामाणिकपणे नोकरी करून पोट भरण्याचा मानस या युवकाचा आहे. तथापि, शासन, प्रशासन मात्र त्याची दखल घेत नसल्याने हा युवक हताश झाला आहे. अंध असल्याने पोट भरण्यासाठी मोलमजुरी करता येणार नाही आणि कोणी कामही देणार नाही. त्यामुळे या युवकाने देशी, विदेशी दारू विकण्याचा अर्थात कोणालाही आवडणार नाही, असा मार्ग पत्करण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांना रितसर निवेदन पाठवून दारूविक्रीच्या दुकानाचा परवाना देण्याची मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास १ मेपासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून भोयणी फाट्यावर देशी, विदेशी दारू विकून पोट भरो आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनाच्या प्रती गृहविभागाचे प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी वाशिम, पोलीस अधिक्षक वाशिम, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक वाशिम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत.