वाशिम जिल्ह्यात ३३ हजार एकर क्षेत्र अद्यापही पेरणीविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 03:02 PM2019-07-24T15:02:01+5:302019-07-24T15:02:10+5:30

जिल्ह्यात सुमारे ३३ हजार एकर क्षेत्रावर अद्यापपर्यंत पेरणीच झालेली नाही.

About 3,000 acres of land in Washim district without sowing yet! | वाशिम जिल्ह्यात ३३ हजार एकर क्षेत्र अद्यापही पेरणीविना!

वाशिम जिल्ह्यात ३३ हजार एकर क्षेत्र अद्यापही पेरणीविना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चालू महिन्यातील २० जुलैचा अपवाद वगळता मोठ्या स्वरूपातील तथा संततधार पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात सुमारे ३३ हजार एकर क्षेत्रावर अद्यापपर्यंत पेरणीच झालेली नसून ज्या शेतकऱ्यांनी थोड्याथोडक्या पावसानंतर पेरणी केली, ती पाण्याअभावी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात सरासरी ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षीत असते. यंदा मात्र पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही विलंबाने सुरू झाल्या. परिणामी, सोयाबिनचा अपवाद वगळता उडिद, मुग या कडधान्य पिकांसह अन्य पिकांचे क्षेत्र घटले आहे. जिल्ह्यात ८२ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी अपेक्षित असताना कृषी विभागाच्या २० जुलैच्या अहवालानुसार ७७ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने तूर पिकाचे क्षेत्र ६१ हजार ९७१, उडिद पिकाचे ८ हजार ३३८, मुग पिकाचे ६ हजार ३९०, इतर कडधान्य पिकांचे क्षेत्र १ हजार १३४ हेक्टर आहे. पावसाच्या विलंबाचा मुख्य फटका तृणधान्य पिकांच्या क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात आधीच जेमतेम १२ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पिकांची पेरणी अपेक्षित असताना केवळ ३ हजार ३१० हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. त्यात ११ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ८७१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. त्याशिवाय बाजरी ९१ हेक्टर, मका ५०६ हेक्टर, तर ३८ हेक्टरवर इतर तृणधान्य पिकांची पेरणी आहे. गळीत पिकांची पेरणी २ लाख ७५ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षीत असताना २ लाख ८८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन २ लाख ८८ हजार २४६ हेक्टर, तीळ ३६ हेक्टर, तर इतर पिकांचे क्षेत्र ३ हेक्टर आहे. कपाशीची पेरणी सरासरीच्या तुलनेत कमी झाली असली तरी, गतवर्षीच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढला असून, २४ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. ऊसाची ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. पेरणी झालेले एकूण क्षेत्र ३ लाख ९४ हजार ३१० हेक्टर असून, अद्यापही ३३ हजार एकर क्षेत्रावरील खरीप पेरणी प्रलंबितच असल्याचे दिसून येत आहे. आता केवळ सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात थोडी वाढ होण्याची अपेक्षा असली तरी, पेरणीची वेळ निघून जात असल्याने हजारो हेक्टर शेती पडित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तुरीच्या पेरणी क्षेत्रात झाली वाढ
जिल्ह्यात सरासरी ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी अपेक्षीत असते. यंदा मात्र पावसाला विलंब झाला आणि बाजारात तुरीला अपेक्षीत दर मिळत नसल्याने तुरीचे क्षेत्र कमी होण्याची भिती होती; परंतु चित्र अगदी त्याउलट असून, जिल्ह्यात ६१ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रावर तुर पिकाची पेरणी झाली आहे. याशिवाय सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ झाली असून, सरासरी २ लाख ७६ हजार १९ हेक्टरवर या पिकाची पेरणी अपेक्षीत असताना २ लाख ८८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.


पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. तथापि, अद्यापही शेतकरी पेरणी करीत आहेत. त्यामुळे खरीपाची पेरणी पूर्णच होणार असल्याची खात्री आहे. पावसाने दीर्घ खंड दिल्यास मात्र, काही निवडक शेतकरी जोखीम पत्करू शकणार नाहीत.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, वाशिम

Web Title: About 3,000 acres of land in Washim district without sowing yet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.