फरार ट्रकचालक परराज्यात गेला; अन् परतही आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:48 AM2020-04-22T11:48:09+5:302020-04-22T11:48:23+5:30

ट्रकचा चालक फरार होऊन मध्यप्रदेशातील इंदोर येथे ट्रकच्या मालकाकडे गेला आणि सोमवारी रात्री पुन्हा मंगरूळपीर येथे परतही आला.

The absconding truck driver went indore; And came back! | फरार ट्रकचालक परराज्यात गेला; अन् परतही आला!

फरार ट्रकचालक परराज्यात गेला; अन् परतही आला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी जारी केलेले ‘लॉकडाऊन’ आणि जिल्हा सीमाबंदीनंतरही मंगरुळपीर येथून ३० मार्च रोजी राजस्थानचे कामगार घेऊन जात असलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकासह ७४ कामगारांना जि.प. शाळेत ठेवण्यात आले; मात्र ट्रकचा चालक फरार होऊन मध्यप्रदेशातील इंदोर येथे ट्रकच्या मालकाकडे गेला आणि सोमवारी रात्री पुन्हा मंगरूळपीर येथे परतही आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी शासनाने सर्वच जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्यात ३० मार्च रोजी मंगरुळपीर येथून राजस्थानकडे ७४ कामगार घेऊन जात असलेला ट्रक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पकडला. ट्रॅकमधील चालक आणि ७४ कामगारांना स्थानिक जिल्हा परिषद शाळेत ठेवत प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली.

दरम्यान, या ट्रकच्या चालकाने फरार होऊन थेट मध्यप्रदेशातील इंदोर गाठले. तेथे संबंधित ट्रकच्या मालकाची भेट घेतली; परंतु ट्रकमालकाने त्याची कुठलीच सबब ऐकून न घेता, त्याला परत पाठवून कोणत्याही परिस्थितीत ट्रक परत घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, इंदोर येथील पोलिसांनीही चालकाला चोप दिला. त्यानंतर हा चालक इंदोर येथून परत निघाला आणि लॉकडाऊन, जिल्हा सीमाबंदीतही थेट मंगरुळपीर येथे पोहोचला. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामीण रूग्णालयात त्याची तपासणी केली असता त्याला ताप असल्याचे आढळून आले.
दरम्यान, परजिल्ह्यातून आल्यामुळे त्याच्यावर पालिका प्रशासन, पोलिसांनी कारवाई करीत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे जिल्हा सीमाबंदीच्या अंमलबजावणीवर मात्र मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The absconding truck driver went indore; And came back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.