शैक्षणिक सत्र सहा दिवसांवर; मोफत पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:30+5:302021-06-22T04:27:30+5:30
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: ...
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत एक लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी सात लाख सहा हजार ५५० पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तथापि, शैक्षणिक सत्र अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असतानाही जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
-----
जुन्या पुस्तकांचे संकलनही नाही
शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होईल व झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार २०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. यासाठी जिल्ह्यात ओल्ड बुक बँक योजनाही राबविण्याचे ठरले होते; परंतु कोरोना संसर्गामुळे या योजनेंतर्गत शाळांत पुस्तकेच परत कोणी केली नाही.
-----
पुस्तकांचे वाटप कसे करणार
कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी अद्याप कोरोनाची भीती दूर झाली नसून, तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडूनच वर्तविली जात आहे. त्यात या लाटेचा बालकांना अधिक धोका राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच यंदाचे शैक्षणिक सत्रही ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. अशात शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात आल्यास त्याचे वितरण विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन करणार की शाळेत बोलावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--------
कोट : यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत एक लाख २६ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे; परंतु अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झाला नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन त्यांचे वितरण कसे करायचे, याबाबत नियोजन केले जाणार आहे.
- गजाननराव डाबेराव,
प्र.उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम
-------------
तालुकानिहाय विद्यार्थी आणि पुस्तकांची मागणी
तालुका - विद्यार्थी - पुस्तके
वाशिम - २८,२३४ - १,६०,६५९
मालेगाव - १९,७४६ - १,०९,१२९
रिसोड - २५,४४० - १,४१,५४२
मं.पीर - १७,३३४ - ९८,११२
कारंजा - १९,००४ १,०४,५७५
मानोरा - १६,५४३ ९१,५३३
---------------------------