एसीबीच्या जाळय़ात लाईनमन
By admin | Published: September 3, 2015 01:48 AM2015-09-03T01:48:33+5:302015-09-03T01:48:33+5:30
मोबाइलवर लाचेची मागणी केल्याच्या तक्रार; आरोपी ताब्यात.
रिसोड (जि. वाशिम): मोबाइलवर लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीहून रिसोड तालुक्यातील रिठद सर्कलमध्ये कार्यरत असलेले लाईनमन खुशाल विठोबा डुबे (वय ५६) यांना २ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. एका तक्रारदाराने १२ जून रोजी शेतात इलेक्ट्रीक पोल बसवून त्यावर वीज कनेक्शन जोडण्याकरिता तत्कालीन अभियंता खोडके यांना १५00 रुपये देण्याकरिता लाइनमन डुबे यांनी लाचेची मागणी केली, अशा आशयाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमकडे नोंदविली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष तक्रारदाराला आरोपी लाईनमन डुबे यांच्याशी मोबाइलद्वारे संभाषण करण्यास सांगितले. डुबे याने तक्रारदारास वीज कनेक्शन व पोल उभारणीकरिता १५00 रुपये लाचेची मागणी केल्याचे संभाषण मोबाइलवर रेकॉर्डिंंग झाले. या पुराव्याच्या आधारे २ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने आरोपी लाइनमन डुबे यांना कार्यरत असलेल्या गावातून ताब्यात घेतले आणि रिसोड पोलीस स्टेशनमध्ये पुढील कारवाईसाठी आणले. येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमोटे, अपर पोलीस अधीक्षक एस.एल. मुंढे, पोलीस उपअधीक्षक व्ही. एम. आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्हाडे व कर्मचार्यांनी केली.