समृद्धी महामार्गावरून कोसळल्याने ट्रक पेटला; होरपळून दोघांचा मृत्यू
By संतोष वानखडे | Published: June 20, 2023 03:43 PM2023-06-20T15:43:41+5:302023-06-20T15:44:22+5:30
कारंजा हद्दीतील लोकेशन १७८ वरील घटना
संतोष वानखडे, वाशिम : चालकाला डुलकी आल्याने ट्रक समृद्धी महामार्गाच्या पुलावरून कोसळून पेटला आणि या अपघातात चालकासह क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना कारंजा ते दोनद दरम्यान समृद्धी महामार्गाच्या लोकेशन १७८ वर २० जून रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.
प्राप्त माहितीनुसार २० जून रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास संभाजीनगर येथून पश्चिम बंगालकडे जात असलेला ट्रक कारंजा ते दोनद दरम्यान समृद्धी महामार्गाच्या लोकेशन १७८ वर पोहोचला असता चालकाला डुलकी आली. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक समृद्धी मार्गाच्या मधोमध असलेल्या पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला. यावेळी कठड्याला घर्षण झाल्यामुळे डिझेल टॅंक फुटून ट्रकने पेट घेतला. यात ट्रकचालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रथम महाराष्ट्र सुरक्षा बल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल व कारंजा शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून कारंजा शहर पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीअथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला, तर चालक व क्लिनरही होरपळून ठार झाले. आगीवर नियंत्रणासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे एपीआय पवार, पीएसआय रेघिवालेसह पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, कारंजा न.प. अग्निशमन दलाचे अधिकारी बाथम, चालक चंदू कटारे, कृष्णा कोकाटे, संकेत अघमे व समृद्धी लोकेशन १०८ चे पायलट विधाता चव्हाण. डॉ. गणेश पायलट, आतिश चव्हाण, डॉ. सोहेल खान, श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा, आस-आपत्कालीनचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी मदत केली.
मृतदेह बाहेर काढण्यास लागले चार तास
समृद्धी महामार्गावरील पुलावरून कोसळल्याने पेटलेल्या ट्रकमध्ये अडकून चालक व क्लिनर ठार झाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल, कारंजा पोलीस आणि अग्निशमन दलास चार तास परिश्रम करावे लागले. वृत्त लिहिस्तोवर मृतकांची ओळख पटू शकली नव्हती.