घरकुलाच्या बांधकामानुसार मिळणार ‘अभियंत्यांना’ मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:22 PM2018-09-29T15:22:56+5:302018-09-29T15:24:23+5:30
वाशिम : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध केले जाणार आहेत.
वाशिम : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध केले जाणार आहेत. या अभियंत्यांना घरकुलाच्या बांधकाम टप्प्यानुसार मानधन मिळणार असून बाह्य यंत्रणांची निवड करण्याचे अधिकारही जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.
ग्रामीण भागात घरकुलासंदर्भात राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे राज्यात जवळपास १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागाने बाह्य यंत्रणा निवडीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना २५ सप्टेंबर रोजीच्या पत्रान्वये बहाल केले असून, जिल्हास्तरावर निवड समिती गठीत करण्याच्या सूचनाही दिल्या. ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार मानधन मिळणार आहे. डोंगराळ, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील एक घरकुल पूर्ण करण्यासाठी एक हजार रुपये आणि सलग भूप्रदेश व इतर भागातील घरकुल पूर्ण करण्यासाठी ७५० रुपये याप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे टप्पा्निहाय मानधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
डोंगराळ, दुर्गम व एकात्मिक कृती आराखड्यातील जिल्हे या भागातील नवीन २०० घरकुलांसाठी किंवा प्रगतीपथावरील ८०० घरकुल टप्प्यासाठी एक तसेच सलग भूप्रदेश व इतर भागातील नवीन २५० घरकुलांसाठी किंवा प्रगतीपथावरील एक हजार घरकुल टप्प्यासाठी एक या प्रमाणे राज्यात १६०० ग्रामीण गृहनिमाण अभियंते हे मनुष्यबळ पुरवठा करणाºया बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेतले जाणार आहेत.
यासंदर्भात वाशिम जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना म्हणाले की ग्रामीण विकास विभागाच्या सुचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.