खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:27 AM2021-04-03T11:27:23+5:302021-04-03T11:28:18+5:30
Accused of murder arrested : गायकवाड यांचा गळा दाबून खून केल्याची बाब निष्पन्न झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील अमानी येथील लक्ष्मण महादू गायकवाड (५२) यांचा पाण्यात बुडून आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र, तपासात गायकवाड यांचा गळा दाबून खून केल्याची बाब निष्पन्न झाली. त्यावरून पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन दोन आरोपींना २ एप्रिल रोजी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड यांचा मृतदेह देवराव सावळे यांच्या शेतातील विहिरीत ३१ मार्च रोजी आढळला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गायकवाड यांचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. अधिक चाैकशी केली असता, ३० मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास लक्ष्मण गायकवाड हे गावातीलच दादाराव अर्जुन खंडारे व सुनील रमेश इंगोले या दोघांसोबत मोटारसायकलवर बसून पार्टी करण्याकरिता देवराव सावळे यांच्या शेतात गेले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी पार्टी सुरू असताना, दादाराव खंडारे व सुनील इंगोले हे लक्ष्मण गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होते, ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळून आले. त्यावरून पोलिसांनी दादाराव खंडारे व सुनील इंगोले यांचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. फिर्यादी संदीप गायकवाड (रा.अमानी) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून दोन्ही आरोपींवर १ एप्रिल रोजी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि तडसे करित आहेत.
पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि गजानन तडसे, पोहेकाँ कैलास कोकाटे, गणेश बियाणी, गजानन झगरे, समाधान वाघ यांनी सदर प्रकरण उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.