खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:52 AM2021-04-08T11:52:32+5:302021-04-08T11:52:40+5:30
Murder Case : तालुक्यातील अनसिंग येथे १५ जानेवारी २०१९ रोजी सदर हत्याकांड घडले होते
वाशिम : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन संजय केशव काले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषी आढळून आल्याने आरोपी सागर सुरेश गवहाने यास तदर्थ अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश डॉ.रचना आर. तेहरा यांनी भादंविचे कलम ३०२ अन्वये बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तालुक्यातील अनसिंग येथे १५ जानेवारी २०१९ रोजी सदर हत्याकांड घडले होते. याप्रकरणी फिर्यादी राहुल केशव काले याने अनसिंग पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद केले होते की, घटनेच्या दिवशी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास गावातील प.दी. जैन शाळेत स्नेहसंमेलन सुरु होते. तो पाहण्यासाठी आपण मोठे बंधु संजय केशव काले यांच्यासोबत शाळेत गेलो असता आरोपी सागर सुरेश गवहाने याने आपणास रागाने काय पाहतो असे म्हणत शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर लोकांनी भांडण सोडविले. तेथून घरी परत जात असताना आरोपी सागर गव्हाणे याच्या चहाच्या टपरीसमोर आरोपी श्याम अशोक गव्हाणे, अजय विजय गव्हाणे, शुभम अंकुश सोनवणे, अक्षय अमरावतकर, रामेश्वर सुरेश गव्हाणे, श्याम शिंदे, गजानन गव्हाणे, गणेश राऊत, गणेश अमरावतकर व सागर सुरेश गव्हाणे यांनी अडवणूक केली. यावेळी सागरने आपल्या डोक्यात लोखंडी रॉड मारला तर इतर आरोपीतांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आपण दोघे बंधू पोलीस स्टेशनला पोहोचत असताना पोलिस स्टेशनच्या गेटसमोरच आरोपी सागर याने पाठीमागुन धावत येत बंधु संजय यांच्या डोक्यात दगड मारला व बाकी आरोपितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी गेटवरच काका रमेश काले यांना सुद्धा धक्काबुक्की केली व आरोपितांनी आपल्या घरावर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. मोठे बंधु संजय गंभीर जख्मी होऊन जागेवरच बेशुद्ध पडल्यामुळे रमेश काले, नीलेश माधव काले व गजानन विष्णु गवली यांनी त्यांना उपचारासाठी त्वरित वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. राहुल काले यांच्या फिर्यादीवरुन अनसिंग पोलिसांनी सदर प्रकरणी सर्व आरोपींविरूद्ध कलम १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ४५२, ४२७, २९४, ५०६, ३०२ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी तपास करून आरोपितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात न्यायालयाने एकूण १४ साक्षीदार तपासले. यापैकी ९ साक्षीदार फितूर झाले. साक्षी पुराव्यावरुन खून प्रकरणी दोषी आढळून आल्याने आरोपी सागर गव्हाने यास कलम ३०२ मध्ये तदर्थ अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश डॉ. तेहरा यांनी जन्मठेप शिक्षा सुनावली, तर आरोपी क्रमांक २ ते १० यांना कलम ३२१ व कलम ३४१ मध्ये प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.