आरोपी मोकाट फिरताना दुर्लक्ष; आता घेतला जातोय शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:41+5:302021-01-22T04:36:41+5:30

वाशिम : ‘मग्रारोहयो’अंतर्गत मारसूळ (ता.मालेगाव) येथे झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून ३१ ...

The accused neglected to walk around Mokat; Searching now! | आरोपी मोकाट फिरताना दुर्लक्ष; आता घेतला जातोय शोध!

आरोपी मोकाट फिरताना दुर्लक्ष; आता घेतला जातोय शोध!

Next

वाशिम : ‘मग्रारोहयो’अंतर्गत मारसूळ (ता.मालेगाव) येथे झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून ३१ डिसेंबर २०२० रोजी १४ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर बरेच दिवस आरोपी मोकाट फिरत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले; आता मात्र ते पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

मारसूळ येथे ‘मग्रारोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मालेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माधव साखरे यांनी ३१ डिसेंबर रोजी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप कोटकर, कुलदीप कांबळे, संजय महागांवकर, कनिष्ठ अभियंता कैलास मगर, तांत्रिक कंत्राटी अधिकारी पवन भुते, सहायक लेखा अधिकारी सुभाष इंगळे, सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश्वर तागतोडे, संगणक परिचालक विनोद आगाशे, सागर इंगोले, ग्रामसेवक संतोष खुळे, ग्रामसेविका सोनल इंगळे, नीलेश ढंगारे, रोजगार सेवक शत्रुघ्न खिल्लारे, ब्राम्हणवाडाचे सरपंच पंजाबराव घुगे अशा १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असे असले तरी २१ दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर काही दिवस बरेच आरोपी मोकाट फिरत होते. त्यावेळी पोलिसांनी कुठलीही ठोस ‘अ‍ॅक्शन’ घेतली नाही आणि आता सर्वच आरोपी पसार झाले असताना त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटत आहे.

.....................

बॉक्स :

घोटाळ्यामुळे मजूर बेरोजगार; विकासालाही ठेंगा

ग्रामीण भागातील नोंदणीकृत प्रत्येक प्रौढ व्यक्तीस अकुशल रोजगाराचा हक्क मिळवून देण्यासह वित्तीय वर्षात जॉब कार्डधारक प्रत्येक मजुरास किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती झाली. या माध्यमातून यंत्रांशिवाय विविध स्वरूपातील विकासकामे मार्गी लावण्याचा उद्देश बाळगण्यात आला. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच ‘मग्रारोहयो’ला भ्रष्टाचाराची कीड लावल्याने ना मजुरांना रोजगार मिळत आहे, ना विकासाची कुठलीही कामे पूर्ण होत आहेत.

...................

कोट :

मारसूळ येथील रोहयो घोटाळ्याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी १४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासूनच आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच बहुतांश आरोपी गजाआड झालेले दिसतील.

- आधारसिंह सोनोने

पोलीस निरीक्षक, मालेगाव पोलीस स्टेशन

Web Title: The accused neglected to walk around Mokat; Searching now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.