आसेगावच्या धरणाने गाठला तळ!
By admin | Published: May 22, 2017 01:19 AM2017-05-22T01:19:18+5:302017-05-22T01:19:18+5:30
पाण्याची गळती : सिंचनासही अपुरे पडले पाणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे. : येथील लघु सिंचन प्रकल्पाने तळ गाठल्याने उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
आसेगाव येथे साधारणत: ११ वर्षापूर्वी लघु सिंचन विभागाअंतर्गत आसेगाव बांध धरण निर्माण करण्यात आले होते. आजघडीला धरण कोरडेठण पडले आहे. या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली. २०१६ मध्ये धरण पूर्ण भरल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, दादर या पिकाचा पेरा केला होता. भुईमूग पीक ऐन मोसमात असताना, धरणातील जलसाठा कमी झाला. परिणामी, शेतकऱ्यांची तारांबळ झाली. पिकाला पाणी कमी पडल्याने उत्पादनात प्रचंड घट आली व येत आहे. या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती होत असल्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त पाणी वाहून जाऊन धरणामध्ये असणारा जलसाठा कमी झाले, असे मानले जात आहे. धरणातून पाणी गळती होणार नाही, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले असते तर आजरोजी धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. धरणाने तळ गाठल्याने आसेगाव परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सोबतच जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे कुणाचेही लक्ष नाही. झाडाझुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन झुडूपे तोडणे अपेक्षीत आहे.
आसेगाव येथील धरणाच्या गळतीचा प्रश्न गांभीर्याने घेवून हे धरण पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करण्याचे प्रयत्न केले जातील. यासह धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे-झुडूपे तोडण्याबाबतही कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. धरण नादुरूस्तीमुळे कुठलेही नुकसान होणार नाही, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील.
- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम