अॅक्यूपंचर डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:46+5:302021-05-10T04:40:46+5:30
वाशिम : राज्यात कोेरोना महामारीची भयावह परिस्थिती असताना या साथरोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर ...
वाशिम : राज्यात कोेरोना महामारीची भयावह परिस्थिती असताना या साथरोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पदभरतीच्या घोषणेनुसार अॅक्यूपंचर परिषदेकडून अधिकृत असलेल्या राज्यातील ॲक्यूपंचर पात्रता धारकांना रुग्णसेवा करण्यासाठी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी अल्टरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी ९ मे रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अॅक्यूपंचर चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनिमयन करून तिचा विकास करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक इतर विवक्षित बाबींच्या संबंधात तरतुदी करण्याकरिता अधिनियमाद्वारे महाराष्ट्र अॅक्यूपंचर परिषदेची स्थापना केली आहे. परिषद अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील व राज्याबाहेरील अॅक्यूपंचर व्यवसायाची नोंदणी प्रक्रिया परिषदेने राबविली असून, या प्रक्रियेमध्ये (७३४०) अॅक्यूपंचर व्यावसायिकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच या व्यावसायिकांना परिषदेकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी आपण केलेल्या आरोग्य पदभरतीच्या घोषणेनुसार पदभरतीमध्ये अॅक्यूपंचरच्या २० टक्के जागा आरक्षित करून त्यामध्ये अॅक्यूपंचर व्यावसायिकांना संधी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. हिवाळे यांनी केली आहे.