८९ गावांत विहिर अधिग्रहण; तीन ठिकाणी टॅंकरने पाणी! पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना
By संतोष वानखडे | Published: June 12, 2024 04:46 PM2024-06-12T16:46:55+5:302024-06-12T16:47:13+5:30
जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्यांत अनेक गावांतील जलस्त्रोत कोरडेठण्ण पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
वाशिम : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, ८९ गावांची तहान भागविण्यासाठी ८० ठिकाणी विहिर अधिग्रहण, ९ ठिकाणी बोअर अधिग्रहण तर ३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत नळयोजनांची कामे केली जात आहेत. जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्यांत अनेक गावांतील जलस्त्रोत कोरडेठण्ण पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत १२६ गावांत पाणीटंचाई कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्या-त्या गावातील प्राप्त प्रस्ताव व आवश्यकतेनुसार विहिर, बोअर अधिग्रहण तसेच टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. ११ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९२ गावांत पाणीटंचाईच्या झळा तिव्र झाल्या असून, पाणीटंचाई निवारणार्थ ८९ गावांत विहिर, बोअर अधिग्रहण करण्यात आले तर तीन गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नळयोजना असलेल्या उर्वरीत गावांमध्ये पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची तिव्रता कमी होण्यासाठी जिल्ह्यात येत्या एक, दोन दिवसांत दमदार पाऊस अपेक्षित आहे.
कोणत्या तालुक्यात किती विहिर/बोअर अधिग्रहण?
तालुका / गावे
वाशिम / १२
मालेगाव / १४
रिसोड / ११
मानोरा / १८
मं.पीर / २०
कारंजा / १४
एकूण / ८९
...............