२१ दिवसांत तीन हजार वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:32 PM2021-05-06T17:32:58+5:302021-05-06T17:33:05+5:30
Washim traffic police : वाहतूक शाखेने वाहतूक नियमांना वाकुल्या दाखविणाºया जवळपास तीन हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून संचारबंदीचे सुधारीत आदेश लागू असून, १५ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसांत वाशिम शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियमांना वाकुल्या दाखविणाºया जवळपास तीन हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. लॉकडाऊनमुळे मास्कच्या कारवायांमध्ये घट असली तरी तिबल सीटचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक नियमांचे पालन तसेच चालकांनी मास्कचा वापर करावा, असे निर्देश आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाशिम शहरात वाहतूक नियम न पाळणाºयांविरूद्ध कारवाई केली जात आहे. गत २१ दिवसांत जवळपास ३१०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स नसणे, मास्क नसणे, तिबल सीट तसेच कोणतेही कारण नसताना विनाकारण फिरणे आदी कारणांचा समावेश आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला यासह अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू असतात. या दरम्यान वाहतुकीची वर्दळ असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाते. दुपारनंतर शुकशुकाट राहत असल्याने मास्कच्या कारवायांमध्ये घट आल्याचे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले. तिबल सीटच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून येते. २१ दिवसांत जवळपास २२० चालकांवर मास्कचा वापर न केल्याप्रकरणी कारवाई केली. जवळपास ५०० जणांवर तिबल सीटप्रकरणी कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून वाहतूक नियमाचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रमुख नागेश मोहोड यांनी केले.