रेशन धान्य दुकानांसदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्यास सर्वोच्च प्राधान्य- राजेंद्रसिंग जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:03 PM2020-06-27T16:03:04+5:302020-06-27T16:48:47+5:30
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. या दरम्यान शासनाने पात्र लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वितरीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुरूवातीच्या काळात अंगठा पद्धतीला दुकानदारांचा विरोध, त्यानंतर नियमाचे उल्लंघन, दुकानांसमोर लाभार्थींच्या रांगा, स्थलांतरीत तसेच शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण , तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरारी पथकाचे गठण आदीसंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..
लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात लाभार्थींवा अंगठा घेण्याच्या पद्धतीला रेशन दुकानदारांचा विरोध होता. सदर प्रकरण कसे हाताळले?
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लाभार्थींचे अंगठे घेण्याला रेशन दुकानदारांचा राज्यभरातच विरोध होता. अंगठे न घेता धान्य वितरणाला परवानगी मिळाल्याने हा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला. रेशन दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागू नये आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याकरीता शिक्षकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.
प्राधान्य गटातील किती लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वाटप सुरू आहे?
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून महिन्याचे मोफत तांदळाचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यात प्राधान्य गटात १ लाख ७७ हजार तर अंत्योदय गटात जवळपास ४८ हजार शिधापत्रिकाधारक आहेत.
अनेक दुकानदार नियमांचे पालन करीत नाहीत, याबाबत काय सांगाल?
नियमांचे पालन न करणाºयावर कारवाईची मोहिम सुरू आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एकूण २४ दुकानांविरूद्ध कारवाई केली. यामध्ये १२ दुकाने रद्द, दोन दुकाने निलंबित, १० दुकानांची अनामत जप्त करून सुधारणा करण्याची ताकीद दिली. नियमाचे पालन प्रत्येक दुकानदाराने करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा होतो काय?
रेशन धान्य वितरण व रेशन दुकानासंदर्भात लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकाचे गठण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीनुसार पडताळणी करून दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाते. आतापर्यंत या पथकाकडे २४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोषी आढळून आलेल्या दुकानदारांविरूद्ध कारवाईदेखील करण्यात आली आहे.
स्थलांतरीत तसेच शिधापत्रिकाधारक नसलेल्या लाभार्थींना मोफत तांदूळ व दाळ वितरीत करण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत. स्थलांतरीत, शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचा आकडा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले. जिल्ह्यात ७९३ कुटुंबातील १४ हजार २९१ नागरीक आहेत. या नागरिकांनादेखील मोफत तांदूळ व दाळ वितरणाचा लाभ दिला जात आहे.