दारूभट्ट्यांवर कारवाई; ११ आरोपींवर गुन्हा!
By admin | Published: April 28, 2017 01:42 AM2017-04-28T01:42:35+5:302017-04-28T01:42:35+5:30
गावठी दारू विक्रेत्यांमध्ये दहशत : पोलिस प्रशासनाची धडक मोहीम
मानोरा : शहर व तालुक्यात विविध ठिकाणी बेकायदा दारूअड्डयांवर पोलिसांनी गुरूवार, २७ एप्रिल रोजी धाड टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला. तसेच ११ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईमुळे बेकायदा गावठी दारु विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, २६ व गुरुवार, २७ एप्रिलला पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात बेकायदा गावठी दारु गाळणाऱ्या अड्डयांवर छापे मारले. शहरातील वडारपुऱ्यात अपर पोलीस अधीक्षक सपना गोरे यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी प्रविण गजानन जाधव, इंदिरा लक्ष्मण लगडे, संजय नरसू शिंदे, व टाले यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. यात सुमारे ५७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलिसांनी ग्राम अभईखेडा येथे छापा टाकला असता, १० लिटर गावठी दारु जप्त केली. आरोपी दत्ता भेलकेविरुद्ध कारवाई करण्यात आली. विठोली येथे पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघणे यांनी छापा टाकून ५० लिटर गावठी दारु, ३०० लिटर सडवा असा ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला. यातील आरोपी सुरेश पारधी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
बिट जमादार रमेश बोडखे यांनी रोहणा व साखरखेडा येथे टाकलेल्या छाप्यात दोघांविरुद्ध कारवाई केली. साखरडोह येथील आरोपी उषा रामा वाघमारे हिच्याकडून ४० लिटर गावठी दारू जप्त केली; तर रोहणा येथील आरोपी अजाब अंबोरे याच्याकडून ५० लिटर दारू व ५० लिटर सडवा माल जप्त करण्यात आला. चौसाळा येथील बिटजमादार प्रकाश भगत यांनी टाकलेल्या छाप्यात आरोपी रेशीबाई सुभाष जाधव हिच्याकडून ५ लिटर दारू जप्त केली.
बिट जमादार सुभाष महाजन यांनी विठोली येथे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आरोपी रेणूका राठोड हिच्याकडून ५० लिटर दारु, ५० लिटर सडवा व शेख रशिद शेख मेहबुब याच्याकडून ३० लिटर दारु, १०० लिटर सडवा असा माल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लाखो रुपयाचा माल जप्त करून ११ आरोपींविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे शहर तथा तालुक्यात अवैधरीत्या गावठी दारू गाळून विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.