शेतीवरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी
By admin | Published: May 24, 2017 01:52 AM2017-05-24T01:52:15+5:302017-05-24T01:52:15+5:30
परस्परविरोधात तक्रार : आठ जणांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जागा व शेतीच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांत असलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या या सख्ख्या दोन भावांच्या कुटुंबात मंगळवारी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, दोन्ही गटाकडील एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
वैभव सोहन गायकवाड याने मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की, २३ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्याचे वडील-आई आणि मोठा भाऊ दीपक घरी बसलेले असताना, त्याचे मोठे काका अरविंद नामदेव गायकवाड, त्यांची पत्नी मथुराबाई, त्यांची दोन मुले अमोल व सतीश रा. केशवनगर तालुका रिसोड यांनी घराचे कुलूप तोडले. घराचे कुलूप का तोडले, असं विचारले असता, चुलतभाऊ अमोल याने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर सतीशने धरले. रॉडने डोक्यावर मारून जखमी केले तर चौघांनी शिवीगाळ करीत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अरविंद नामदेव गायकवाड, मथुराबाई अरविंद गायकवाड, अमोल अरविंद गायकवाड व सतीश अरविंद गायकवाड यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटाकडून अरविंद नामदेव गायकवाड यांनी फिर्याद दिली की, ते मालेगावला त्यांच्या वडिलांच्या घरी आले असता, त्यांचा भाऊ सोहन नामदेव गायकवाड, ज्योती सोहन गायकवाड, वैभव सोहन गायकवाड व दीपक सोहन गायकवाड यांनी शिवीगाळ केली. दीपकने तलवार हाताच्या अंगठ्यावर मारून जखमी केले. या फिर्यादीवरून उपरोक्त चौघांविरूद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.