बालकामगार शोधण्यासाठी कृती दलाच्या आस्थापनांवर धाडी
By दिनेश पठाडे | Published: December 29, 2023 06:15 PM2023-12-29T18:15:56+5:302023-12-29T18:16:21+5:30
जिल्हास्तरीय कृती दलाच्या वतीने सातत्याने बालकामगार शोध मोहीम राबविली जाते.
वाशिम : चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे, जनरल स्टोअर्स आदी सारख्या दुकानांमध्ये बालकामगार काम करण्याची शक्यता असते. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच, शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. त्यामुळे बालकामगारविरधोत वेगवान कार्यवाही केली जात आहे. २९ डिसेंबर रोजी वाशिम शहरात आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी बालकामगारांचा शोध तसेच इतर अनुषंगीक बाबींची तपासणी पथकाने केली.
जिल्हास्तरीय कृती दलाच्या वतीने सातत्याने बालकामगार शोध मोहीम राबविली जाते. शुक्रवारी वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरातील अनेक आस्थापनांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी एकाही ठिकाणी बालकामगार आढळून आला नाही. त्याशिवाय आस्थापनामालकांनी दुकानाचे नाव सुरुवातीला मराठीत आणि ठळक अक्षरात असणार फलक लावावा, दुकानाचा परवाना, नुतनीकरण यासह इतर बाबींची तपासणी पथकाने केली. हे धाडसत्र कामगार उपआयुक्त नि. पा.पाटणकर यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आ.शी.राठोड, शॉप इन्स्पेक्टर
किरण राठोड, योगेश गोटे, कर्मचारी धिरज राजगुरू, अतुल ढेले, लक्ष्मण आडे, पोलिस कर्मचारी संदीप वाकुडकर, चाईल्ड लाईन चे शाहिद खान, विस्तार अधिकारी सुरेश उगले यांच्या पथकाने धाडसत्र राबविले.
११ महिन्यांत ९३ आस्थापनांची पाहणी
जिल्हा कृती दलाने जानेवारी २०२३ ते आतापर्यंत एकूण ६ धाडसत्र राबविले. यामध्ये एकूण ९३ आस्थापनांना भेटी देण्यात आली. त्यावर एकही बालकामगार आढळून आला नसल्याची माहिती कामगार विभागाकडून देण्यात आली. प्रत्येक आस्थापनावर येथे बालकामगार काम करीत नाही अशा आशयाचे स्टीकर चिटकविण्यात आले. बालकामगार आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा भेटी दरम्यान आस्थापनधारकांना देण्यात आला.