अवैध गौण खनिजप्रकरणी कारवाई
By admin | Published: December 9, 2015 02:47 AM2015-12-09T02:47:01+5:302015-12-09T02:47:01+5:30
दोन पावत्यांची पडताळणी; रेती चोरीचे मराठवाडा कनेक्शन.
वाशिम : अवैध गौण खनिजप्रकरणी वाशिम तहसील कार्यालयाने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात जवळपास १५ वाहनांविरूद्ध कारवाई करून ६0 हजारापेक्षा अधिक दंड वसूल केला. दरम्यान, ७ डिसेंबरला दोन वाहने ताब्यात घेतली असून, चालकांची चौकशी सुरू आहे. कागदपत्र व पावत्यांची पडताळणी केल्यानंतर कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. जिल्ह्यात रेतीघाट लिलाव बंद असतानाही गौण खनिजाची अवैध व चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. मराठवाड्यातून रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यात रेती मोठय़ा प्रमाणात येत आहे. वाशिम तहसील कार्यालयाने गत सव्वा महिन्यात अवैध गौण खनिजप्रकरणी जवळपास ६0 हजाराचा दंड वसूल केला. रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याच्या संशयावरून ७ डिसेंबरला एमएच ३७ बी ७९३ आणि एमएच 0४ सीए २८२६ या दोन क्रमांकाचे ट्रक तहसील कार्यालयात लावण्यात आले. संबंधितांना रेतीची पावती व आवश्यक कागदपत्रे दाखविण्याची मागणी केली. पावती आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत रेतीसाठय़ाची अधिकृत पावती असल्याचा दावा संबंधितांनी केला. या पावतीची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पावती अधिकृत असेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. मात्र, पावती बनावट असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई होण्याचे संकेत आहेत. चोरीच्या रेती वाहतुकीचे ह्यमराठवाडा कनेक्शनह्ण समोर येत आहे. दरम्यान, अवैध गौण खनिजप्रकरणी कोणतेही वाहन तहसील कार्यालयाने पकडल्यास यापुढे उपविभागीय अधिकार्यांच्या परवानगीशिवाय ते सोडता येणार नाही. त्यामुळे कारवाईची मोहीम अधिक तीव्र होत असल्याचे दिसते.