संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४.८९ कोटींचा कृती आराखडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:58 PM2020-02-05T14:58:33+5:302020-02-05T14:58:53+5:30
आवश्यक त्या ठिकाणी कृती आराखड्यानुसार प्रशासनातर्फे उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात यंदा संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४.८९ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत जून २०१९ पर्यंत २३३ गावांसाठी २५९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या भागात या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९६.६० मिलीमिटर पाऊस कोसळणे अपेक्षित आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात तुलनेने कमी पर्जन्यमान झाले; मात्र परतीच्या पावसाने पर्जन्यमानाने सरासरी गाठल्याने बहुतांश प्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा निर्माण झाला. असे असले तरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत. त्यापृष्ठभुमिवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई निवारणाकरिता ४ कोटी ८९ लाखांचा कृषी आराखडा तयार केला आहे.
या कृती आराखड्यात वाशिम तालुक्यातील २९, मालेगाव ६४, रिसोड १४, मंगरूळपीर ५०, मानोरा ४२ आणि कारंजा तालुक्यातील ३४ अशा एकूण २३३ गावांमधील खासगी विहिरींचे अधीग्रहण, तात्पुरती पुरक नळ योजना, विहिरींची विशेष दुरुस्ती, टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा आदि उपाय योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या आराखड्याचा कालावधी जून २०१९ पर्यंत असून, या कालावधीपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी कृती आराखड्यानुसार प्रशासनातर्फे उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.