वाशिम जिल्ह्यातील ८ रास्तभाव दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:27 PM2020-04-13T17:27:15+5:302020-04-13T17:27:25+5:30
बेलखेड येथील शरद वानखडे यांच्या रास्तभाव दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
वाशिम : नोवेल कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत शासन नियमाचे उल्लंघन करणाºया जिल्ह्यातील ८ रेशन दुकानांविरूद्ध निलंबन, परवाना रद्द, अनामत रक्कम जप्त आदी स्वरुपातील कारवाई जिल्हा पुरवठा विभागाने १० ते १३ एप्रिल या दरम्यान केली आहे.
संचारबंदी कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत रास्तभाव दुकानदारांनी अत्यंत दक्षपणे काम करणे अपेक्षित असताना काही रास्तभाव दुकानदार हे शासन नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील अशा ८ रास्तभाव दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. संबंधित तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या रास्तभाव दुकानांच्या तपासणी अहवालावरून मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील के. के. भुतडा यांच्या रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील प्रजापिता महिला बचत गट, अनसिंग येथील जी. टी. घुगे व कारंजा तालुक्यातील बेलखेड येथील शरद वानखडे यांच्या रास्तभाव दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील के. बी. घुगे, गोकसावंगी येथील भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, हनवतखेडा येथील गजानन राऊत व रिसोड तालुक्यातील भापूर येथील विजय बोडखे यांच्या रास्तभाव दुकानांच्या प्रधिकारपत्राची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून यापुढे सुधारणेसाठी सक्त ताकीद देण्यात आली,असे जिल्हा पुरवठा अधिकारी जाधव यांनी सांगितले.