जिल्ह्यात १६ वीज चोरट्यांवर धडक कारवाई, २४ लाखांचा दंड : भरारी पथक ‘अलर्ट मोड’वर
By सुनील काकडे | Published: April 14, 2023 07:37 PM2023-04-14T19:37:08+5:302023-04-14T19:37:14+5:30
महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वाशिम: मीटरमध्ये हेराफेरी करून किंवा थेट विद्युत तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणे जिल्ह्यातील १६ वीज चोरट्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून २४ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे. जे दंड भरणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध विद्युत कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी घडणाऱ्या वीज चोरीचा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक सध्या ‘अलर्ट मोड’वर आले आहे. याअंतर्गत एप्रिल महिन्यात आतापर्यंत कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे पाच, मानोरा एक, वाशिम दोन, कारंजा तीन आणि जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथील पाच वीज चोरट्यांना वीज चोरी करताना पकडण्यात आले. संबंधितांना २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. जे दंडाची रक्कम अदा करणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत चालू महिन्यात १६ जणांची वीज चोरी पकडण्यात आली. संबंधितांकडून २४ लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे. - सतीश मोरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भरारी पथक