आता प्लास्टिकचा वापर करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:32 PM2018-07-14T16:32:08+5:302018-07-14T16:36:52+5:30
वाशिममध्ये प्लास्टिक निर्मूलन पथक सक्रीय
वाशिम : शासन निर्देशानुसार २३ जूनपासून सर्वत्र प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्रीवर सक्तीने बंदी लादण्यात आली असून नियम तोडणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी निर्णयाचे स्वागत केले असून काही जण अजुनही वापर करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून आता लग्न समारंभासह इतर कार्यक्रमासाठी मंगल कार्यालयामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय वाशिम नगरपरिषदेने घेतला आहे. काही मंगल कार्यालयांना प्लास्टिक न वापरण्याच्या सूचना सुध्दा देण्यात आल्या आहेत.
जिल्हयातील सर्वच नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक वापरणाऱ्यांवर धाडसत्र राबवून दंड वसूल सुरु केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात सर्वांत आघाडीवर वाशिम नगरपरिषद असून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीसह दंडात्मक कारवाई पथकाच्यावतीने करण्यात येत आहे.
वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष रुपेश वाघमारे व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी एक पथक तयार केले असून सदर पथक शहरांमध्ये फिरुन प्लास्टीक बंदीसाठी पुढाकार घेताना दिसून येत आहे. शहरातील बहुतांश प्रतिष्ठानावरील प्लास्टिक बंदीनंतर आता या पथकाने आपला मोर्चा मंगल कार्यालयाकडे वळविला आहे. सर्व मंगल कार्यालयांना आपल्या मंगल कार्यालयात कोणत्याही समारंभासाठी प्लास्टिकचा वापर करण्याची परवानगी न देण्याचे सांगण्यात येत आहे असे आढळून आल्यास मंगल कार्यालयांवरच कारवाई केली जाणार असल्याने मंगल कार्यालय संचालक खबरदारी घेताना दिसून येत आहेत.
वाशिम येथील प्लास्टिक निर्मूलन पथकामध्ये आरोग्य सहायक जितु बढेल, राजेश महाले, मुकादम बबनराव भांदुर्गे, नागपूरकर, दशरथ मोहळे, लाला मांजरे, सुनिल करोते, लक्ष्मण बढेल यांचा समावेश आहे. तसेच वाशिम शहरामध्ये सुरु केलेल्या प्लास्टिक बंदीवरील दंड व जनजागृतीमुळे भाजीबाजारात मिळणारी प्लास्टिक पिशव्या बंद झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना मागितल्यावर त्यांना वायरच्या पिशव्या देण्यात येत आहेत.
प्लास्टिकमुळे उद्भवणारे आजार पाहता नागरिकांनी ते वापरु नये याबाबत जनजागृती केली जात आहे. जे या नियमांची पायमल्ली करताहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
शहरात नियमित प्लास्टिक पिशव्या, वस्तु वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरु आहे. यापुढे प्लास्टिकचा वापर करण्याची परवानगी देणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाणार आहे.
- जितु बढेल, आरोग्य सहायक, न.प. वाशिम