संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:57 AM2020-04-06T10:57:31+5:302020-04-06T10:57:39+5:30
पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ५ एप्रिल रोजी केले.
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध आता पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली असून, गत दोन दिवसांत जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली. नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ५ एप्रिल रोजी केले.
कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगभरात झपाट्याने वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घरातच रहावे, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी अथवा औषधी खरेदीसाठी शक्यतो एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे केले जात आहे. तथापि, काही जण अत्यावश्यक काम नसतानाही रस्त्यावरून फिरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. या पृष्ठभूमीवर अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाºया नागरिकांची वाहने जप्त करणे, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या दरम्यान नागरिकांनीदेखील गांभीर्य लक्षात घेऊन घरातच राहणे संयुक्तिक आहे. परंतू काही जण अद्यापही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, वाहने जप्त करणे, गुन्हे दाखल केले जात आहे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम