वाशिम जिल्ह्यातील वास्तव : प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:18 AM2018-01-31T01:18:50+5:302018-01-31T01:18:59+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या उद्देशाने जलसंधारण विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात २0 हून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यासाठी संबंधित विभागाच्यावतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही प्रकल्पांचे काम सुरू झाले, तर उर्वरितपैकी तीन प्रकल्पांच्या कामांत वन जमिनीच्या संपादनाचा अडथळा निर्माण झाला. अखेर यातील दोन प्रकल्पांना पूर्णत: मान्यता मिळाली. त्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकले. अखेर या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये कुकसा, मिर्झापूर, सुरकंडी, वडगाव, वाकद, पळसखेड, इंगलवाडी, पंचाळा, पांगराबंदी, स्वासीन, वाडी रायताळ, वारा जहागिर आणि शेलगाव प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी सुरकंडी आणि वडगाव प्रकल्पात पाणीसाठा करून सिंचनासाठी त्याचा वापरही होत असून, या प्रकल्पांचे किरकोळ काम उरले आहे. तथापि, उर्वरित ११ प्रकल्पांचे काम अद्याप बरेच पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या प्रकल्पांची उभारणी सुरू केली तो उद्देश अद्यापही सफल होऊ शकला नाही.
प्रशासन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करीत असले तरी, कामे करताना प्रत्यक्ष येणार्या अडचणी आणि कामाचा वेग यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. हे ११ प्रकल्प येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित गावांतील शेतकर्यांना सिंचनाचा प्रश्न सुटून पाणी समस्येवर मात करणे शक्य होणार आहे.