शेतीला ‘इस्त्राईल’ तंत्रज्ञानाची जोड; स्वयंचलित खते, पाण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 11:34 AM2020-08-09T11:34:58+5:302020-08-09T11:35:31+5:30
‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाने स्वयंचलित पद्धतीने पिकांना खते व पाणी दिले जात असल्याने वेळ व पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पादनात वाढ झाली आहे.
- अमोल कल्याणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : इस्त्राईल देशातील ‘आॅटोमेशन’ या तंत्रज्ञानाची जोड देत तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली आहे. ‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाने स्वयंचलित पद्धतीने पिकांना खते व पाणी दिले जात असल्याने वेळ व पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पादनात वाढ झाली आहे.
डोंगरकिन्ही येथील डॉ. हेमंत देशमुख यांच्याकडे वडीलोपार्जित ३५ एकर शेती असून, २००८ पासून ते शेती सांभाळत आहेत. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करीत त्यांनी शेतीचा कायापालट केला. सिंचनाची सुविधा म्हणून सुरूवातीला विहिर आणि त्यानंतर पाच बोअर घेतले. दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार करीत पाण्याची साठवणूकही केली. पिकांना आवश्यक तेवढेच खत व पाणी मिळावे याकरीता खत व पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ते इस्त्राईल तंत्रज्ञानाकडे वळाले. ‘आॅटोमेशन’ तंत्रज्ञानाची जोड देऊन ते शेती करीत आहेत. कोणत्या पिकाला किती पाणी व खत द्यायचे ते सर्व एका जागेवर बसून ‘आॅपरेट’ केले जाते. पाण्याची बचत होत असल्याने ते वर्षभर फळबाग, भाजीपाला व अन्य पिके घेतात. केळी, पपई, संत्रा या फळबागेसोबतच हळद, मिरची, टोमॅटो, कांदा बियाणे आदी भाजीपालावर्गीय पिकांतून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. सेंद्रीय पद्धतीने शेती करणाºया डॉ. देशमुख यांनी शेतात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून व मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतीवर वॉचही ठेवतात. शेतीत केलेल्या नानाविध प्रयोगाची दखल म्हणून यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शेतीनिष्ठ पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाासह कृषी विज्ञान केंद्र करडाकडूनही पुरस्कार मिळाले आहेत.
आॅटोमेशन तंत्रज्ञानानुसार, डॉ. देशमुख यांनी शेतात एक खोली बांधकाम करून तेथे इस्त्राईल तंत्रज्ञानाने सुसज्ज असे संगणकीकृत खते आणि पाणी देण्याच्या सर्व मशिन बसविल्या. त्यावर वेळ सेट केल्या जाते आणि कोणत्या पिकाला किती पाणी व खते द्यायचे त्याचे प्रमाण ठरवून, एका जागेवर बसून हे सर्व आॅपरेट केले जाते. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे भरघोष उत्पादन घेता येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.