१०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी; वाशिम जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
By दादाराव गायकवाड | Published: September 8, 2022 06:58 PM2022-09-08T18:58:44+5:302022-09-08T18:59:54+5:30
वाशिम जिल्ह्यात १०५१ मतदान केंद्रांत मतदार ओळखपत्राला आधार जोडणी होणार आहे.
वाशिम : मतदार याद्यांच्या प्रमाणिकरणासाठी व मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम १ ऑगस्टपासून हाती घेतला आहे. जिल्ह्यात ११ सप्टेंबर रोजी १०५१ मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी फॉर्म नंबर ६ (ब) भरुन निवडणूक विभागाद्वारे नियुक्त मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे सादर करावा. निवडणूक विभागाकडून व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी घरोघरी भेट देत आहे. मतदार यादीतील १०० टक्के मतदारांशी संपर्क करुन मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली असल्याने मतदारांनी या सुरक्षेबाबत शंका बाळगू नये, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.