गुरुजींवर अतिरिक्त कामांचा बोजा, विद्यार्थ्यांचै शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 02:13 PM2018-10-28T14:13:22+5:302018-10-28T14:13:52+5:30
मानोरा (वाशिम): जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर अतिरिक्त शासकीय कामांची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर अतिरिक्त शासकीय कामांची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत यंदाच्या सत्रातील प्रथम सत्राची परिक्षा सर्वत्र सुरू असताना जिल्ह्यातील अनेक गुरुजी मतदार नोंदणी कार्यक्रमात गुंतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच मिळेनासे झाले असून, पालकवर्गात यामुळे नाराजी पसरली आहे.
जिल्ह्यात आगामी काळात टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा आदि निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रशासनाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी मतदान केंद्र अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविलेल्या शिक्षकांकडून मतदार यादीची पडताळणी करण्यासह मतदार नोंदणीचे काम करून घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील किमान दोन शिक्षक या कामांत गुंतले आहेत. त्यांच्याकडून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यात येत असली तरी, मतदार यादी अद्ययावती करणात अनेक अडचणी येत आहेत. सोयाबीन काढणीसह रब्बी पेरणीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर सकाळीच घरून बाहेर पडत असल्याने शिक्षकांना संध्याकाळपर्यंत या कामांतच वेळ घालवावा लागतो. याचा परिणाम शाळेच्या कामकाजावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.