खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकेतरांचे समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:29+5:302021-04-02T04:43:29+5:30
राज्यात २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील जे मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक आदी शिक्षकेतर ...
राज्यात २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील जे मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक आदी शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे समायोजन करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी २६ मार्च रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत. या आनुषंगाने वाशिम जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी खासगी अनुदानित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांना या संदर्भात एक पत्र देऊन त्यांच्या संस्थांतर्गत शाळांत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन ५ एप्रिलपर्यंत संस्थास्तरावर करण्याच्या सूचना दिल्या असून, या संदर्भातील अहवाल ६ एप्रिल रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांची धडपड होत असल्याचे दिसत आहे.
----------------
अतिरिक्त ठरणाऱ्यांच्या यादीचे अद्ययावतीकरण
वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकेतरांचे समायोजन करण्यासाठी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतरांची यादी अद्ययावत करण्यात येत आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना दिल्या असून, ही यादी अद्ययावत झाल्यानंतरच जिल्ह्यात किती शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त आहेत. ते स्पष्ट होणार आहे.
----------------
संस्थास्तरानंतर शिक्षण विभागाकडून समायोजन
जिल्ह्यात २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार जे शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे प्रथम संस्थास्तरावर समायोजन केले जाणार आहे. या प्रक्रियेतूनही काही शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त राहणार आहेत. अशा शिक्षकेतरांचे समायोजन जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येणार असून, यासाठीच यादीचे अद्ययावतीकरणही केले जात आहे.
----------
कोट: जिल्ह्यात २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार अनुदानित माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी सोडून इतर शिक्षकेतरांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी संबंधित संस्थास्तरावर ५ एप्रिलपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिल्या आहेत. त्यानंतर उर्वरित शिक्षकेतरांचे समायोजन आमच्या स्तरावरून केले जाईल.
-रमेश तांगडे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी,
जि. प. वाशिम