तूर मोजणीसाठी प्रशासनाची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:45 AM2017-07-31T01:45:46+5:302017-07-31T01:45:46+5:30
वाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जिल्ह्यात २६ जुलैपासून तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु मागील चार दिवसांत ६ केंद्रावर मिळून ३७५ शेतकºयांची मिळून केवळ ६ हजार ६९४ क्विंटल तुरीची मोजणी प्रशासनाला शक्य झाली आहे. प्रशासनाची तूर मोजणीसाठी कसरत होत असून, मोजणी संथगतीने होत असल्यामुळे शेतकºयांना खरिपाच्या हंगामात शेतीवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात ३१ मेपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांपैकी १४ हजार ५४२ शेतकºयांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर मोजणी बाकी होती; परंतु या शेतकºयांची तूर मोजणी होण्यापूर्वीच शासनाने शासकीय खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधी पक्षांसह शेतकºयांच्यावतीने या संदर्भात वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार शासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तूर मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर मोजून घेण्याचा निर्णय २३ जुलै रोजी जाहीर केला.
त्या निर्णयातील सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत टोकनधारक शेतकºयांकडे असलेली शिल्लक तुरीची पडताळणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि गट सचिवाचा समावेश असलेले पथक सहाही तालुक्यात नियुक्त केले. त्या पथकाच्या तपासणीनुसार २६ जुलैपासून जिल्ह्यातील मालेगाव, वाशिम, कारंजा आणि अनसिंग या चार ठिकाणी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासकीय तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी मंगरुळपीर आणि रिसोड येथेही ही खरेदी सुरू करण्यात आली; परंतु मागील चार दिवसांत सहाही केंद्रांवर मिळून केवळ ३ हजार ७६७ क्विंटल तूर या केंद्रांवर मोजण्यात आली. आता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना शेतीकडे लक्ष देणे आवश्यक असताना तूर मोजणीला विलंब लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
अद्यापही जिल्ह्यात १४ हजार ३२९ टोकनधारक शेतकºयांची २ लाख ८० हजार ७६९ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. या तुरीच्या मोजणीला विलंब लागणार असल्याने शेतकºयांना खरीप हंगामातील पिकांची देखभाल करणे, थकीत कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणे, तसेच पीक विमा उतरविण्याची कामे करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक विमा भरण्याची मुदत ३१ जुलै असल्याने अनेक शेतकºयांची पंचाईत झाली आहे. तूर मोजणी केंद्रावर थांबावे, पीक कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावा की शेतीकडे लक्ष द्यावे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहेत.
मुदतवाढीचा टोकनधारक शेतकºयांना आधार
शासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकºयांची तूर मोजण्यासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. तथापि, केवळ सात दिवसांत शिल्लक राहिलेली पावणे तीन लाख क्विंटलच्यावर तूर मोजून घेणे कठीण असल्याने विविध स्तरावरून शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. शासनाने याबाबीचा सारासार विचार करून टोकनधारक शेतकºयांच्या शिल्लक राहिलेल्या तुरीच्या मोजणीसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे टोकनधारक शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घ्यावी लागणार आहे. तूर पडताळणीसाठी नियुक्त केलेले पथक शेतकºयांकडून माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहे. मर्यादित मनुष्यबळापोटी सद्यस्थितीत तूर मोजणी वेगात होऊ शकली नाही; परंतु निर्धारित मुदतीच्या खूप आधी जिल्ह्यातील सर्वच टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घेतली जाईल.
- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम