चक्राकार आरक्षणाचा प्रशासनाचा कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:44+5:302021-03-22T04:37:44+5:30
वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजित आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषित करण्यात आले होते. मात्र , घोषित आरक्षण ...
वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजित आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषित करण्यात आले होते. मात्र , घोषित आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे आरक्षण अधिक होते . त्यामुळे या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती . तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारिणीला मुदतवाढ दिली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका दाखल करून घेत, न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते. आयोगाने यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या होत्या. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी सुरुच होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मागास प्रवर्गातील जागांवरील निवडणुका रद्द ठरविल्या आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढील दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. असे आदेश दिले होते.
जिल्हा परिषदेमधील एकूण ५२ जागांपैकी १४ जागांवर निवडणूक होत आहे. आता यापैकी सात जागा महिला सर्वसाधारण प्रवर्गात राखीव निघणार आहेत. चक्राकार आरक्षण कायदा १९९६ नुसार प्रशासनाला आरक्षण सोडत जाहीर करावी लागणार आहे
काटा गट दोन वेळा सर्वसाधारण झाल्याने हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. पार्डी टकमोर गट एकदा सर्वसाधारण महिला प्रवर्गात गेला होता त्यामुळे हा गट सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. उकळी पेन गटात एकदा आरक्षण, महिला प्रवर्गात पडले असल्याने हा गट सर्वसाधारण प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. पांगरी नवघरे गट दोन वेळेस सर्वसाधारण प्रवर्गात होता. त्यामुळे यावेळेस हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गात जाऊ शकतो. कवठा खुर्द गटात नजीकचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गात होते. त्यामुळे हा गट यावेळेस महिलासाठी राखीव होऊ शकतो. गोभणी हा गट दोन वेळा सर्वसाधारण निघाला होता. यावेळेस हा गट महिला प्रवर्गात समावेशित होऊ शकतो. भर जहागीर हा गट मागील वेळेस महिला प्रवर्गात होता. आता तो सर्वसाधारण प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. दाभा गटही मागील वेळेस महिला प्रवर्गात होता. यावेळेस सर्वसाधारण प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. कंझरा गट सर्वसाधारणमध्ये तर भामदेवी, महिला प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. कुपटा गट फुलउमरी या गटातही सर्वसाधारण महिला आरक्षण झाले असल्याने हे गट सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. आसेगाव गटात लगतचे आरक्षण सर्वसाधारण होते. त्यामुळे हा गट महिला प्रवर्गात समावेशित होऊ शकतो. तळप हा गट मागील वेळेस सर्वसाधारण होता. त्यामुळे यावेळेस हा गट महिला राखीव होऊ शकतो.