शिरपूर बसस्थानकामागच्या नाल्यावरील अतिक्रमणाची प्रशासनाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:30+5:302021-06-28T04:27:30+5:30
शिरपूर येथील बस स्थानकामागील भागात देशी दारू दुकानाजवळ सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठा सिमेंट नाला बांधलेला आहे. ...
शिरपूर येथील बस स्थानकामागील भागात देशी दारू दुकानाजवळ सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोठा सिमेंट नाला बांधलेला आहे. या नाल्यावर मागील चार-पाच वर्षांत काही ठिकाणी पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. याचा मोठा त्रास लगतच्या रहिवाशांना होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसाने नाला ओव्हर फ्लो होऊन लोकांच्या घरांमध्ये व शेतात पाणी घुसण्याचा प्रकार घडला. याचा नाल्याकाठालगत असलेल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण काढून सफाई करण्याची मागणी २४ जून रोजी किशोर देशमुख, धनु देशमुख, संजय जाधव, माधव देशमुख, टिनू देशमुख, आतिष जाधव, अमोल देशमुख, अमर देशमुख, किशोर जाधव यांच्यासह परिसरातील ३५ रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे केली होती. याची दखल मालेगाव पंचायत समिती व स्थानिक ग्रामपंचायतीने घेतली आहे. २६ जून रोजी गटविकास अधिकारी पद्मवार, विस्तार अधिकारी लोखंडे, ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे, विजय अंभोरे, तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी नाला असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. गटविकास अधिकारी यांनी या नाल्याची सफाई करून अतिक्रमणाबाबत नियमानुसार कारवाई करावी, असे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला यावेळी सांगितल्याची माहिती गटविकास अधिकारी पद्मवार यांनी दिली.