पावसाच्या घटलेल्या सरासरीबाबत प्रशासन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:43 PM2019-08-02T13:43:52+5:302019-08-02T13:43:59+5:30
शासन गंभीर असून, पाणी आरक्षणाबाबत निर्धारीत वेळेपूर्वीच मंथन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदा जिल्ह्यात सद्यस्थितीत अपेक्षीत सरासरीच्या तुलनेत खुप कमी पाऊस पडला आहे. अद्यापही जिल्ह्यातील धरणांत पुरेसा साठाच झाला नाही. त्यामुळे प्रशासन गंभीर असून, पाणी आरक्षणाबाबत निर्धारीत वेळेपूर्वीच मंथन केले जाणार आहे. त्यातच रब्बी हंगामाचे नियोजनही करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९८.७० मि. मी. पाऊस पडतो, तर १ जुन ते १ आॅगस्टदरम्यान ४२८.८० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना जिल्ह्यात याच कालावधित जिल्ह्यात केवळ ११९.२४ पाऊस पडला अर्थात सद्यस्थितीत १ जुन ते १ आॅगस्टदरम्यान अपेक्षीत सरासरीच्या केवळ २६ टक्केच पाऊस पडला, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.२७ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळेच पावसाळा अर्धा उलटूनही जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेसा जलसाठा झालेला नाही.
जिल्ह्यातील १३१ प्रकल्पांची पातळी अद्याप १५ टक्क्यांपर्यंतही आलेली नाही. पावसाची सरासरी अशीच राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न खुप गंभीर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी लक्षात घेऊन निर्धारित वेळेपूर्वीच पाणी आरक्षण समितीची बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षीत करण्यात येणार आहे. त्यासाठी गावांगावात दंवडी देऊन पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात येणार असल्याने रब्बी पिके न घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
जलपुनर्भरणासाठी भव्य स्वरूपात शोषखड्डे
जिल्ह्यात पावसाची सरासरी खुप कमी झाली असून, उरलेल्या दिवसांत पावसाची सरासरी अशीच राहिल्यास भीषण पाणीटंचाईचा सामना जनतेला करावा लागणार आहे. अशात पडणाऱ्या पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत जिरविण्यासाठी गावागावांत ज्या ठिकाणी पाणी अधिकाधिक जमिनीत जिरविता येईल अशा ठिकाणी ६ मीटर व्यास आणि ३० मीटर खोल आकाराचे भव्य शोषखड्डे खोदण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील कमी लोकसंख्येच्या २५ गावांची यासाठी निवड करण्याची तयारी प्रशासनाने केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शोषखड्ड्याची कामे केली जाणार आहेत.
जिल्ह्यात पावसाची सरासरी खुप कमी असल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरविण्यासह प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत करण्याचे नियोजन आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास रब्बीची पेरणी कमी करण्यासाठीही आवाहन करण्यात येणार आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम