पीक नुकसानाच्या पंचनाम्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:35+5:302021-02-23T05:02:35+5:30
इंझोरीतील प्रकार : जि. प. सदस्यांंचे तहसीलदारांंना निवेदन इंझोरी : मानोरा तालुक्यातील इंझोरी सर्कलमध्ये गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी ...
इंझोरीतील प्रकार : जि. प. सदस्यांंचे तहसीलदारांंना निवेदन
इंझोरी : मानोरा तालुक्यातील इंझोरी सर्कलमध्ये गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे काढणीवर आलेला शेतातील हरभरा, गहू ही उभी पिके उद्धवस्त झाली असताना प्रशासनाकडून अद्याप या नुकसानाची पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाले असून, शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद सदस्य विनादेवी जयस्वाल, सरपंच व उपसरपंचांनी मानोराच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांंना निवेदन सादर केले.
इंझोरी सर्कलमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. जवळपास तासभर कोसळलेल्या पावसामुळे काढणीवर आलेला हरभरा आणि गहू पिकासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या शेतात गहू पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे या पीक नुकसानाचे पंचनामे प्रशासनाने करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. परंतु चार दिवस उलटले तरी प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य विनादेवी अजय जयस्वाल यांच्यासह भाजप सदस्य अजय जयस्वाल, सरपंच हिम्मत राऊत पाटील व उपसरपंच शंकर नागोलकार यांनी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांची सोमवारी भेट घेत शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती दिली, तसेच मानोरा तहसीलदारांना निवेदन सादर करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
------------
पाणंद रस्त्यांची कामे रखडली
इंझोरी: परिसरातील ३१ पाणंद रस्त्यांच्या कामांना आमदार निधीतून मंजुरी मिळाली आहे.
तथापि, कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने आता या रस्त्याची कामे रखडली आहेत.
--------------
गहू कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग
इंझोरी : परिसरात गत आठवड्यात अवकाळी पावसामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले, तर आता कोरोना संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊनची भीती आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी गहू कापणीसाठी लगबग करीत आहेत.
------------
शाळेतील शौचालयांची दुरवस्था
इंझोरी : नजीकच्या तोरणाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शौचालये व प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. शाळा बंद असल्याने ही शौचालये व प्रसाधनगृहे शिक्षण विभागाने दुरूस्त करावीत, अशी मागणी पालक करीत आहेत.