पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर प्रशासनाचा भर
By admin | Published: March 20, 2017 07:20 PM2017-03-20T19:20:54+5:302017-03-20T19:20:54+5:30
रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत.
जिल्ह्यातील स्थिती: पाच तालुक्यातील २२० गावांसाठी १.८७ कोटींच्या योजना
वाशिम: मागील वर्षी जोरदार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर भर दिला जात आहे. एकट्या रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत.
जिल्ह्यात गत पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला; परंतु जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि जल साठवणीचे तोकड्या स्त्रोतामुळे जिल्ह्यातील काही गावांत नेहमीच पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यातील अशाच २५० हून अधिक गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील ४७ गावे, मंगरूळपीर तालुक्यातील ३१ गावे, कारंजा तालुक्यातील ४६ गावे, वाशिम तालुक्यातील ४५ गावे, मालेगाव तालुक्यातील ५१ गावे, तसेच मानोरा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. यातील मानोरा तालुका वगळता इतर तालुक्यातील गावांसाठी १ कोटी ८७ लाख ४३ हजार रुपये खर्चाच्या उपाय योजना शासनाने प्रस्तावित केल्या आहेत. रिसोड पंचायत समितीच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १८० हातपंपांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, विहिर अधिग्रहणाचे ४ प्रस्ताव, नवीन हातपंपांचे १४१ प्रस्ताव, तसेच टँकरचे १० प्रस्ताव सादर केले असून, त्यातील करंजी गरड या गावासाठी एक टँकर त्वरीत मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले