कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:26 AM2017-10-12T01:26:41+5:302017-10-12T01:38:59+5:30

वाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे.

Administrative efforts to pay the debt waiver before Diwali! | कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न!

कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न!

Next
ठळक मुद्देबँक खात्याची पडताळणी पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संबंधित यंत्रणेला प्रशिक्षणही देण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची यादी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्यानंतर राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. शासनाने दीड लाख रुपयांची र्मयादा घालून सरसकट कर्जमाफी दिली. कर्जमाफीसाठी वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आता ग्राम पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू केले जाणार आहे. तत्पूर्वी अचूक असलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी केल्यानंतर आता त्या संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. 
पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, या शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. ही यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार असून, मंजुरी मिळताच या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाल्यानंतर ते नव्याने रब्बी किंवा खरीप पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. 
दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे मिळून एकूण १ लाख ६४ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, दुसर्‍या टप्प्यात या शेतकर्‍यांची यादी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केली जाणार आहे. येथे पडताळणी केली जाणार असून, पडताळणीअंती अचूक यादी तयार होईल. साधारणत: दिवाळीनंतर दुसरा टप्पा सुरू होणार असून, अर्जात किरकोळ त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. 

कर्जमाफीसंदर्भात अचूक अर्ज असणार्‍या पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिने कामकाज सुरू आहे. पहिल्या टप्प्यात साधारणत: ५0 हजारच्या आसपास शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे.
- रमेश कटके,
जिल्हा उपनिबंधक, वाशिम 

Web Title: Administrative efforts to pay the debt waiver before Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.