प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:41+5:302021-03-29T04:23:41+5:30
जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७ हजार १५४ होता. तो पुढील ५६ दिवसांतच (२८ मार्चअखेर) ...
जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७ हजार १५४ होता. तो पुढील ५६ दिवसांतच (२८ मार्चअखेर) तब्बल ८ हजार ११९ ने वाढून १५ हजार २७३ वर पोहोचला आहे. याच कालावधीत कोरोनाने ३० जणांचा मृत्यू झाला; तर १ फेब्रुवारीला उपचार घेत असलेल्या १४० रुग्णांचा आकडा वाढून सध्या तो २६४१ झाला आहे. परिस्थिती खरेच चिंताजनक असून आकडे असेच वाढत राहिल्यास रुग्ण भरती ठेवण्यासाठी शासकीय व खासगी दवाखान्यांमधील बेड्सदेखिल कमी पडतील, अशी भीती प्रशासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम येथील प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या महावितरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक, तहसीलदार यासारखे बडे अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह असून उपचार घेत आहेत. यासह पोलीस दलातील २०० पेक्षा अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागातील सुमारे ४० अधिकारी व कर्मचारी, वाशिम तहसील कार्यालयातील ७ अधिकारी, कर्मचारी, वाशिम नगर परिषदेतील आरोग्य निरीक्षक व अन्य काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यामुळे प्रमुख अधिकारीच संस्थात्मक अथवा गृह विलगीकरणात असल्याने कामकाज पूर्णत: प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
........................
कोट :
प्रशासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दैनंदिन अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यातूनच काहींना कोरोना संसर्गाची बाधा झालेली आहे. संबंधितांवर उपचार सुरू असून जे कर्मचारी बरे झाले, त्यांना रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम