आयटी, सिव्हिल कोर्सनंतर नोकरी? अभियांत्रिकी पदविकेला पसंती; वाशिमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
By दिनेश पठाडे | Published: May 31, 2024 05:36 PM2024-05-31T17:36:11+5:302024-05-31T17:38:29+5:30
याठिकाणी ३६० ची प्रवेश क्षमता असून शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.
दिनेश पठाडे,वाशिम : जिल्ह्यात वाशिम येथे एकमेव शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय कार्यान्वित आहे. याठिकाणी ३६० ची प्रवेश क्षमता असून शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.
इयत्ता दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर इयत्ता ११ वी व तत्सम अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन,ऑटोमोबाइल, मॅकेनिकल आणि सिव्हिल हे कोर्स उपलब्ध आहेत. या सर्वच कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे मागील काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी सर्व जागा भरुन अतिरिक्त जागांवर देखील प्रवेश देण्यात आले. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर झटपट नोकरी मिळत असल्याने विद्यार्थी अलीकडच्या काळात पॉलिटेक्निककडे वळले आहेत. यंदाही विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे वाढला आहे. पहिल्या दिवसांपासूनच प्रवेश अर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कॅम्पसमध्ये येत आहेत.
क्षमता ३६० जगांची-
वाशिम स्थित असलेल्या शासकीय पॉलीटेक्निकमध्ये एकूण ३६० जागांची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कालावधीत वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्ष-
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असलेल्या सहा कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधित अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आदींची सर्वकष माहिती व्हावे, या उद्देशाने तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
कोणत्या कोर्सला किती जागा-
१) माहिती तंत्रज्ञान ६९
२) सिव्हील ६९
३) इलेक्ट्रीकल ६९
४) इलेक्ट्रानिक ६९
४) ऑटोमोबाइल ६८
५) मेकॅनिकल ६७