१३ वर्षानंतर गुणवंत पुरस्कारात वाशिम जिल्हा परिषदेचे नाव झळकले!

By संतोष वानखडे | Published: July 13, 2023 06:56 PM2023-07-13T18:56:19+5:302023-07-13T18:56:27+5:30

ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात.

After 13 years, the name of Washim Zilla Parishad was recognized in Gunwant Award | १३ वर्षानंतर गुणवंत पुरस्कारात वाशिम जिल्हा परिषदेचे नाव झळकले!

१३ वर्षानंतर गुणवंत पुरस्कारात वाशिम जिल्हा परिषदेचे नाव झळकले!

googlenewsNext

वाशिम : ग्रामविकास विभागांतर्गत शासकीय योजना, प्रकल्प राबविताना विशेष वैयक्तिक योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत पुरस्कार दिला जातो. तब्बल १३ वर्षानंतर या पुरस्काराच्या यादीत वाशिम जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचे नाव झळकले असून, वरिष्ठ सहाय्यक प्रविण रामकृष्ण राऊत यांना गुणवंत कर्मचारी पुरस्काराने लवकरच सन्मानित केले जाणार आहे.

ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. विविध योजना, प्रकल्प राबविताना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय व तांत्रिक कौशल्य पणाला लागते. विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्तेचे दर्शन घडवून जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी हे योजना, प्रकल्प यशस्वी करण्यात हातभार लावतात. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप म्हणून राज्य शासनाकडून सन २००५-०६ पासून गुणवंत अधिकारी, कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन २०२०-२१ या वर्षांतील राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३७ गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा गुणवंत पुरस्कार जाहिर झाला असून, यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक प्रविण राऊत यांचाही समावेश आहे. प्रविण राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागात सेवा देताना केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल ग्रामविकास विभागाने घेतली आहे. राऊत यांच्या रुपाने तब्बल १३ वर्षानंतर वाशिम जिल्हा परिषदेचे नाव गुणवंत पुरस्काराच्या यादीत झळकले आहे. यापूर्वी सन २००८-०९ मध्ये एका कर्मचाऱ्याला गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाला होता.

विदर्भातील १० जणांचा समावेश
महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या यादीत विदर्भातील १० जणांचा समावेश आहे. अमरावती विभागातील पाच कर्मचारी असून, यामध्ये प्रत्येकी दोन कर्मचारी हे यवतमाळ व अमरावती जिल्हा परिषदेचे आहेत.

Web Title: After 13 years, the name of Washim Zilla Parishad was recognized in Gunwant Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम