२४ तासानंतर गुरे पडली गोठ्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 01:33 PM2020-03-23T13:33:30+5:302020-03-23T13:33:37+5:30
गुरांनाही चरण्यासाठी बाहेर काढण्यात आले नाही.
लोकमत न्युज नेटवर्क
कारपा: पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारपावासीयांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळला. त्यात शेतकरी, गुराख्यांनी आपल्या गुरांना गोठ्यातच चारा टाकला. त्यामुळे एरव्ही शिवारात स्वच्छंदी फिरणाºया गुरांना बंदिस्त राहावे लागले. अखेर २४ तासानंतर सोमवारी सकाळीच गुरे गोठ्याबाहेर पडली.
कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होेते. या कर्फ्यूला कारपा येथेही प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्वच क्षेत्रात या कर्फ्यूचे पालन झाले. ग्रामस्थांनी दिवसभर घरे बंद ठेवली, शेतकºयांनी शेतातील कामे थांबवली. यात पशूपालक आणि गुराख्यांचाही समावेश होता. त्यामुळे गुरांनाही चरण्यासाठी बाहेर काढण्यात आले नाही. या गुरांना गोठ्यातच चारा खाऊन रवंथ करीत बसावे लागले. एरव्ही प्रात:काळीची गोठ्या बाहेर काढल्यानंतर रानातील विविध प्रकारचा चारा खाणाºया गुरांना दिवसभर कडबा, कुटारानेच पोट भरावे लागले. अर्थात जनता क र्फ्यूचे पालन गुरांसाठी बंधनकारक ठरले. अखेर २४ तासानंतर २३ मार्च रोजी सकाळीच पशूपालक शेतकरी आणि गुराख्यांनी ही गुरे चराईसाठी बाहेर काढली. त्यामुळे गुरांनाही जणू हायसेच वाटल्याचे चित्र दिसून आले.