२५ वर्षानंतर सोनगव्हाण गाव झाले पाणी टंचाईमुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:41 PM2018-05-14T13:41:48+5:302018-05-14T13:41:48+5:30
वाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले.
- नंदकिशोर नारे
वाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. सोनगव्हाणवासियांची तहान भागविण्यासाठी गावातील पाणी गावातच मुरावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सह विविध उपक्रम राबवून २५ वर्षापासूनची पाणी टंचाई सरपंच गोदारा यांनी दूर केली. त्यांच्या या उपक्रमाबाबत व ईतरही विविध गावातील योजनांबाबत पालकमंत्र्यांनीही त्यांचा गौरव केला हे विशेष!
उन्हाळा म्हटले की डोळयासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे चित्र, ओस पडलेली माळ रानं आणि दुष्काळसदृष्य परिस्थितीत दुखरूपी आसवांच्या प्रवाहाने डोळयात वाहत असलेल्या कोरडया नद्यांचे प्रवाह आणि घोटभर पाण्यासाठी दूरवर वणवण फिरून माय माऊलीच्या पायात रूतलेल्या काटयाने बाहेर आलेला लहु हृदयाला हेलकावणी देतो, अशीच काहीसी अवस्था झाली होती ती वाशीम जिल्ह्यातील सोनगव्हाणवासियांची. भौगोलिकदृष्टया जरी हे गाव पैनगंगेच्या तिरावर वसलेले, परंतु हिवाळा संपताच त्या पैनगंगेचा प्रवाह दुषित व्हायचा, गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम अशा सर्वच जलस्त्रोतांनी हिवाळयातच तळ गाठला असताना पाण्यासांठी दिवस रात्र गावकऱ्यांची पायपीट व्हायची. गत २५ वषार्पासुन पाणी टंचाईने कोरडे पडलेले सोनगव्हाण हे गाव कृतीशील आणि उपक्रमशील सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेने पाण्याने तुंडुंब भरल्याने गावकऱ्यांमध्ये अडिच दशकानंतर उत्साहाचे वातावरण निमार्ण झाले आहे. पाण्याअभावी होणारी गावकऱ्यांची वणवण थांबली आहे.
दरम्यान सरपंच शरद गोदारा यांनी २५ वषार्पासून गावातील बंद पडलेल्या कुपनलीकांना व हातपंपाना नवसंजिवनी देण्याचे कार्य करून गावाला पाणी टंचाईपासुन मुक्त केले आहे. पावसाचे पाणी वाया न घालवीत शोषशखड्डयाच्या मार्फत त्याचा निचरा करुन रेनवॉटर हार्वेस्टिंग या तंत्राचा वापर केल्यानेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढली व पारिणामत: अनेक वषार्पासुन बंद पडलेल्या कुपनलीकांना तुंडुब पाणी लागले . पुर्वी गावात पाणी नसल्याने ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत होती. उन्हाळयात गावकरी स्थलांतरीत होऊन संपुर्ण गाव ओस पडायचा ,परंतु दुष्काळसदृृष्य परिस्थितीतही योग्य उपाय योजना व कृतीची अमंलबजावणी केल्यानेच गाव पाणी टंचाईमुक्त झाला आहे असे गौरवोग्दार स्थानिक नागरिक काढीत असुन सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
गावातील पाण्याची समस्या पाहता बेचैन झालो होतो. गावातील पाणी टंचाई दूर कशी करता येईल यासाठी अनेकांची मते जाणून घेतली. स्वताहून रेनवॉटर हार्वेस्टिंगचा विचार डोक्यात आला. सफलता प्राप्त होवो अथवा न होवो करुन पाहले असता पाण्याच्या पातळीत मोठया प्रामणात वाढ झाली व गावातील पाणी टंचाई दूर झाली.
-शरद अशोक गोदारा, सरपंच गटग्रामपंचायत टनका