चावडी वाचनातून निवडणुकीची गावे बाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:07 AM2017-09-27T01:07:16+5:302017-09-27T01:09:51+5:30
वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय, याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’ प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय, याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’ प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त झाली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत म्हणून दीड लाख रुपयां पर्यंतची कर्जमाफी, तसेच २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्या तील २.३७ लाख शेतकर्यांनी ऑनलाइन नोंदणी केली; परंतु त्यामधील केवळ १.२८ लाख शेतकर्यांचेच अर्ज ‘अपलोड’ झाले, तर कर्जमाफी प्रक्रियेतील अटी व शर्तींमध्ये बसू न शकल्यामुळेच अखेरच्या टप्प्यात सुमारे १ लाख शेतकर्यांचे अर्ज बाद ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आता ज्या शेतकर्यांचे अर्ज अपलोड झाले आहेत, ते सर्व शासनाच्या निकषानुसार पात्र आहेत की नाहीत, तसेच काही पात्र शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहिले आहेत काय, याची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदारांच्या मार्गदर्शनात गाव पातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि गटसचिवाचा समावेश असलेले पथक नियुक्त करण्यात येणार आहे. हे पथक गावात ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये शे तकर्यांना कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणार्या शेतकर्यांची यादी वाचून दाखवित. त्यांच्याकडून आक्षेप नोंदवून घेणार आहे. यामध्येच कर्जमाफीसाठी कोणी अपात्र आहे काय, याची पड ताळणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक येत्या ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कक्षेत येणार्या गावांत, ही प्रक्रिया राबविली जाणार नाही. निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले असून, केवळ निवडणूक नसलेल्या गावांतच ही चावडी वाचन प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी मंगळवारी दिली.
अशी असेल चावडी वाचन प्रक्रिया
चावडी वाचनात गावातून आलेल्या अर्जांची यादी एका संचिकेमध्ये लावण्यासह या यादीतील अर्जदार योजनेस पात्र आहेत की नाही, त्याची पडताळणी होईल, तसेच संबंधित अर्जदारांनी इतर बँकेसोबतच त्या गावातील विविध कार्यकारी संस्थेकडून कर्ज घेतले आहे काय, याची खातरजमा संबंधित संस्थेकडून केली जाईल व त्याप्रमाणे अर्जदाराच्या यादीत उल्लेख नसल्यास अशा अर्जदाराच्या नावासमोर त्यांचे संस् थेकडील कर्ज खाते क्रमांक व थकीत रक्कम नमूद करण्यात येईल. गावपातळीवरील माहितीच्या आधारे यादीत संबंधित अर्जदाराच्या नावासमोर वस्तुस्थिती दर्शविणारे शेरे नमूद करण्यासह पात्र, अपात्रतेसंबंधित उपलब्ध पुराव्यांची प्रत त्या संचिकेमध्ये लावण्यात येईल आणि तो पुरावा या संचिकेमध्ये कोणत्या पानावर आहे, याचा उल्लेख अर्जदाराच्या नावासमोरील रकान्यात करण्यात येईल.