ट्रक चालवून पतीच्या पश्चात 'तिने' सावरला संसार; मुलाला बनविले इंजिनीअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 05:06 AM2019-06-04T05:06:57+5:302019-06-04T05:07:06+5:30
नंदुरबारमधील महिलेची धडाडी : १८ वर्षांपूर्वी पतीचे निधन
वाशिम : पोटची चिमुकली मुले रांगण्याच्या वयात असताना पतीच्या अपघाती मृत्यूमुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. मात्र अशा बिकट परिस्थितीसमोर गुडघे न टेकता ‘तिने’ चक्क ट्रक चालविण्याचा व्यवसाय पत्करून मुलांसोबतच स्वत:चेही आयुष्य सावरले. मूळच्या नंदुरबार येथील योगीता रघुवंशी यांचा हा जीवनप्रवास अन्य महिलांना प्रेरणादायी ठरावा असाच आहे.
मोठा मालवाहू ट्रक घेऊन नागपूरवरून नांदेडकडे जाताना योगीता रघुवंशी यांच्याशी वाशिमच्या पुसद नाक्यावर रविवारी सकाळी संवाद साधला असता त्यांच्या जिद्दीची कहाणी उघडकीस आली. महिला ट्रक ड्रायव्हर म्हणून उपस्थित सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. तसेच ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार यांनी त्यांचा सत्कार केला.
योगीता यांचे शिक्षण बी.ए.,एल.एल.बी. पर्यंत झाले असून १८ वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या वेळी त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही अगदीच लहान होते. पतीच्या अचानक जाण्याने पुढचे आयुष्य कसे जगावे, हा बिकट प्रश्न योगीता यांच्यासमोर उभा ठाकला. मात्र त्यांनी न खचता महिलांसाठी सामाजिकदृष्ट्या वर्ज्य असलेला ट्रक ड्रायव्हिंगचा व्यवसाय पत्करला.
सद्यस्थितीत त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे दोन ट्रक असून या व्यवसायाच्या आधारानेच त्यांनी मुलाला इंजिनियर केले; तसेच त्यांची मुलगीही उच्चशिक्षण घेत आहे. दरम्यान, स्त्रियांनी कुठल्याही संकटाला घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना करत सर्वच क्षेत्रात धडाडीने पुढे यावे, असे आवाहन योगीता रघुवंशी करतात.
कंपनीने दिली ट्रकची भेट
एल.एल.बी. असल्याने त्या वकीलही होऊ शकल्या असत्या; परंतु वैयक्तिक समस्यांमुळे त्यांनी ते क्षेत्र न निवडता एका कंपनीत ट्रक ड्रायव्हरची नोकरी पत्करली. यादरम्यान एका मोठ्या ट्रक कंपनीने त्यांच्यातील जीद्द पाहून त्यांना चक्क ट्रक भेट म्हणून दिला. तेव्हापासून त्या स्वत:च चालक आणि मालक म्हणून रस्त्यावरून ट्रक चालवितात.