नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम!
By admin | Published: May 23, 2017 05:52 PM2017-05-23T17:52:57+5:302017-05-23T17:52:57+5:30
नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रशासनाने चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्या असून नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे.
वाढता भ्रष्टाचार, दहशतवाद रोकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वाशिम जिल्ह्यातही उत्स्फूर्त स्वागत झाले. जवळ असलेल्या तद्वतच बंद झालेल्या नोटा बँकांमध्ये जमा करताना आणि जमा केलेला पैसा बँकेतून ह्यविड्रॉलह्ण करताना होणारा त्रास मुकाटपणे सहन करित आज ना उद्या परिस्थिती पुर्वपदावर येण्याची आशा नागरिकांना होती. मात्र, विस्कळित झालेली आर्थिक आजही निवळलेली नाही.
रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेलाच पुरेशा प्रमाणात चलन मिळत नसल्याने खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना पैसा पुरविणे स्टेट बँकेला अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चलनअभावी जिल्ह्यातील सर्वच एटीएम अघोषित स्वरूपात बंद राहत आहेत. बँकांमध्येही नागरिकांना अपेक्षित रकमेचा विड्रॉल मिळत नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार आजही बहुतांशी ठप्प आहेत. एकूणच नोटाबंदीचा निर्णय जाहीर व्हायला सात महिने उलटल्यानंतरही त्याची झळ आजही सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोसावी लागत असल्याचे दिसून येत आहे.