मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे
By नंदकिशोर नारे | Published: February 21, 2024 01:10 PM2024-02-21T13:10:27+5:302024-02-21T13:11:03+5:30
आंदोलनात कारंजा नगर परिषदेचे सफाई कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
नंदकिशाेर नारे
वाशिम... आपल्या विविध मागण्यांसाठी कारंजा नगरपरिषदेतील सफाई कामगारांनी २० फेब्रुवारीपासून कारंजा येथे उपाेषणास सुरुवात केली हाेती. पूर्ण करता येण्यासारख्या मागण्या मान्य करू असे आश्वासन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दिल्याने अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसच्या कारंजा शाखेशी संबंधित नगरपरिषदेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी आपले आंदाेलन मागे घेतले.
कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन पुढे सुरू राहिले तर शहरातील नागरिकांची साफसफाईबाबत होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेता राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी या संदर्भात पुढाकार घेतला. दरम्यान त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे सहकारी जाकीर शेख, सलीम गारवे, अब्दुल एजाज अब्दुल मन्नान यांनी कामगार पुढाऱ्यांसमवेत मुख्याधिकारी दीपक मोरे यांची भेट घेतली आणी सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. दरम्यान पूर्ण करता करता येतील त्याच मागण्या मान्य करून आपण त्या शक्य तितक्या लवकर निकाली काढू असे आश्वासन मुख्याधिकारी मोरे यांनी भेटावयास आलेल्या शिष्टमंडळाला दिले. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष श्याम घारू व कारंजा शाखाध्यक्ष रमेश ढेनवाल यांनी केले. या आंदोलनात कारंजा नगर परिषदेचे सफाई कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.